जळगाव प्रतिनिधी । महावीर अर्बन को-ऑप क्रेडीट सोसायटीने जिल्हा बँकेकडून २००२ मध्ये ८ कोटी रूपये कर्ज घेतले होते. पतसंस्थेने कर्ज भरण्यासाठी ३ कोटी आणि ५ कोटी असे दोन धनादेश दिले होते. मात्र याचा अनादर झाल्यामुळे संचालक मंडळांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात आले होते. याचा निकाल जिल्हा बँकेच्या बाजूने लागला असून आता संबंधित संचालक मंडळाच्या मालमत्तेवर बोजा लाऊन कारवाई करणार असल्याची माहिती माजी मंत्री आमदार एकनाथराव खडसे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
अलीकडेच न्यायालयाने वाघूरसह अन्य योजनांबाबत दिलेल्या निर्देशानंतर उडालेली खळबळ शांत होत नाही तोच बहुचर्चीत महावीर पतसंस्था कर्ज प्रकरणी कोर्टाने जिल्हा बँकेस परवानगी दिली आहे. याबाबतची माहिती आज माजी मंत्री तथा, जिल्हा बँक संचालक एकनाथराव खडसे यांनी दिली. ते म्हणाले की, महावीर पतसंस्थेचे तत्कालीन संचालक मंडळातील मनिष ईश्वरलाल जैन, सुरेद्र नथमलजी लुंकड, सुभाष सागरमल साखला, महेंद्र दुर्लभजी शाह, सुरेंद्र बन्सीलाल जैन, अजित बन्सीलाल कुचेरीया, तुळशीराम खंडू बारी, सपना अश्विन शाह, अपना अजय राका आणि सुरेशकुमार आनंदराजजी टाटीया यांनी कर्ज घेतेवेळी कर्जाबाबत वसूलीबाबतचे हमीपत्र दिले होते. मात्र मुदतीत कर्ज न भरल्याने 17 कोटी 58 लाख रूपयांच्या कर्ज वसुलीसाठी सहकारी न्यायालयात दावा दाखल केला होता. हा दावा जिल्हा बँकेच्या बाजूने लागला असून कर्ज व त्यावरील व्याज भरण्याची जबाबदारी तत्कालीन वरील सर्व संचालक मंडळावर असल्याचा निर्णय दिला आहे.
आठ कोटीचे दिलेले धनादेश झाले अनादर
सहकार विभागाने हा निकाल दिल्यानंतर महावीर सोसायटीने कर्ज भरण्यासाठी अनुक्रमे 3 कोटी आणि 5 कोटी रूपयांचा धनादेश जिल्हा बँकेला दिले होते. हा धनादेश अनादर झाल्याने जिल्हा बँकेने कलम 138 (अ) अन्वये फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला होता. फौजदार दाखलचा निकालही जिल्हा बँकेच्या बाजूने लागला असून महावीर सोसायटीला 11 कोटी रूपये कॉम्पेशेशन, 25 हजार रूपये दंड आणि 1 वर्षाची साधी कैद अशी शिक्षा सुनावली होती. त्यावर वरील संचालक मंडळांनी जिल्हा सत्र न्यायालयात धाव घेतली आहे. या दाव्यासाठी महावीर बँकेच्या संचालक मंडळाने न्यायालयात 50 लाख कॉम्पेशेशन जमा केलेले आहे.
तत्कालीन संचालकांच्या मालमत्तेवर जप्तीची कारवाई करणार !
दरम्यान महावीर अर्बन क्रेडीट सोसायटीने त्यांच्या स्वमालकीच्या इमारतीचे अवास्तव मुल्यांकन व खोटा बोजा बसविलेला उतारा दिला. याबाबत देखील तत्कालीन संचालक मंडळाविरोधात 156/2011 प्रमाणे फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आले आहे. महावीर अर्बन बँकेकडे जिल्हा बँकेचे 31 मार्च 2019 अखेर 7 कोटी 96 लाख 13 हजार रूपये आणि 18 कोटी 84 लाख 75 हजार रूपये असे एकुण 26 कोटी 81 लाख 88 हजार रूपये थकबाकी असून आता जिल्हा बँकेने ही वसुली करण्यासाठी तत्कालीन संचालक मंडळाच्या मालमत्तेवर बोजा किंवा वसुलीची मोहीम राबविणार असल्याची माहिती जिल्हा बँकेचे संचालक तथा आमदार एकनाथराव खडसे यांनी पत्रकार परिषदेत दिली.