
जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील राजकीय वातावरण तापले असून, प्रभाग क्रमांक १३ मध्ये महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस – शरदचंद्र पवार पक्षाच्या अधिकृत उमेदवारांच्या निवडणूक प्रचाराचा आज उत्साहात शुभारंभ झाला. उमेदवार हेमंत भंगाळे, देवयानी चौधरी व सुहास पाटील यांनी मोहन नगर परिसरातील विठ्ठल मंदिरात दर्शन घेऊन प्रचाराला सुरुवात केली.

दिग्गज नेत्यांची उपस्थिती, कार्यकर्त्यांमध्ये उत्साह
यावेळी उमेदवारांचे मनोबल वाढवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे निवडणूक प्रभारी तथा माजी आमदार संतोष चौधरी, महानगराध्यक्ष एजाज मलिक यांच्यासह महाविकास आघाडीचे अनेक पदाधिकारी व शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. दिग्गज नेत्यांच्या उपस्थितीमुळे रॅलीत मोठा उत्साह पाहायला मिळाला.
ढोल-ताशांच्या गजरात भव्य रॅली
मोहन नगर परिसरातून काढण्यात आलेल्या भव्य रॅलीने संपूर्ण परिसर दणाणून गेला. ढोल-ताशांच्या गजरात “तुतारी” चिन्हाचा जयघोष करत महाविकास आघाडीने प्रभाग १३ मध्ये जोरदार शक्तीप्रदर्शन केले. रॅलीदरम्यान ठिकठिकाणी नागरिकांनी उमेदवारांचे पुष्पहार घालून स्वागत केले, तर महिलांनी औक्षण करून विजयाचा विश्वास व्यक्त केला.
विकासाला गती देण्याचा निर्धार
मतदारांशी संवाद साधताना उमेदवार हेमंत भंगाळे, देवयानी चौधरी व सुहास पाटील यांनी प्रभागातील रखडलेल्या विकासकामांना गती देण्याचे आश्वासन दिले. मूलभूत सुविधा, पायाभूत विकास तसेच सामाजिक प्रश्न सोडवण्यासाठी सातत्याने काम करण्याचा संकल्प त्यांनी व्यक्त केला. यावेळी नेत्यांनी प्रभागात सत्तापरिवर्तन निश्चित होणार असल्याचा विश्वासही व्यक्त केला. या प्रचाराच्या शुभारंभामुळे प्रभाग १३ मधील निवडणूक चुरस अधिकच वाढली असून, येत्या काळात राजकीय हालचालींना वेग येणार असल्याचे चित्र आहे.



