कोल्हापूर | राज्य सरकारच्या टिकण्याबाबत अनेक दावे-प्रतिदावे केले जात असतांना आज भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडी सरकार पडणार नसल्याचे सांगून अनेकांना बुचकळ्यात टाकले आहे.
कोल्हापूर येथे प्रसारमाध्यमांशी बोलतांना चंद्रकांत पाटील म्हणाले की, वर्षानुवर्षे सत्तेत राहिल्यानं सरकारमधील पक्षांना सत्तेची ताकद काय असते याची कल्पना आहे. त्यामुळे ते खूप भांडतील. पण सरकार पडू देणार नाहीत. कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले सध्या सातत्यानं आक्रमक विधान करत आहेत. त्यामुळे शिवसेना, राष्ट्रवादीमध्ये नाराजी आहे. पटोलेंच्या विधानांमुळे सरकारला धोका पोहोचेल का, असा प्रश्न पाटील यांना विचारण्यात आला होता. त्या प्रश्नाला पाटील यांनी उत्तर दिलं.
दरम्यान, विरोधकांनी कितीही एकमेकांच्या भेटीगाठी घेऊ द्या, ते कोणाच्याही नेतृत्त्वाखाली निवडणूक लढवू द्या. तरीही आगामी लोकसभा निवडणुकीत भाजप चारशेपेक्षा जास्त जागा जिंकेल, असा विश्वास चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला.