जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । थोर समाजसुधारक महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जयंतीनिमित्त कंजरभाट समाज युवा फाउंडेशनतर्फे ११ एप्रिल रोजी शहरात उत्साहात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. समाजप्रबोधन, शिक्षण आणि समतेचा संदेश देणाऱ्या फुले यांच्या कार्याला यावेळी अभिवादन करण्यात आले.
शहरातील फुले मार्केट परिसरात असलेल्या महात्मा ज्योतिराव फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून मान्यवरांनी अभिवादन केले. या प्रसंगी उपस्थितांनी फुले यांच्या सामाजिक कार्याची आणि शिक्षण प्रसारासाठी दिलेल्या योगदानाची आठवण काढत त्यांच्या विचारांचे महत्त्व अधोरेखित केले. वंचित आणि शोषित घटकांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांनी केलेल्या कार्याचा समाजावर दीर्घकालीन प्रभाव राहिल्याचे मत व्यक्त करण्यात आले.

कार्यक्रमात कंजरभाट समाज युवा फाउंडेशनचे अध्यक्ष योगेश बागडे, मुख्य सल्लागार मोहन गारुंगे, सचिव राहुल नेतलेकर, खजिनदार वीर दहियेकर तसेच सदस्य पंकज गागडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. उपस्थितांनी महात्मा फुले यांच्या विचारांचे अनुसरण करून समाजात समता आणि शिक्षणाचा प्रसार करण्याचा संकल्प व्यक्त केला.



