जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । थोर समाजसुधारक आणि क्रांतिकारक महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जयंतीनिमित्त आज जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या कार्यालयात अभिवादनाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. समाजप्रबोधन, शिक्षण आणि समतेचा संदेश देणाऱ्या फुले यांच्या कार्याची आठवण यावेळी उपस्थितांनी कृतज्ञतेने केली.
शनिवार, दि. ११ एप्रिल रोजी आयोजित या कार्यक्रमात जिल्हा राष्ट्रवादी कार्यालयात महात्मा फुले यांच्या प्रतिमेला जिल्हा कार्यालयाचे सरचिटणीस वाय. एस. महाजन यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून फुले यांच्या विचारांना उजाळा दिला.

भारतीय सामाजिक इतिहासात ११ एप्रिल हा दिवस केवळ एका महान व्यक्तिमत्त्वाच्या जन्माचा दिवस नसून, समता, शिक्षण आणि मानवतेच्या नव्या युगाची सुरुवात दर्शवणारा महत्त्वपूर्ण दिवस मानला जातो. महात्मा ज्योतिराव फुले यांच्या कार्यामुळे समाजव्यवस्थेला नवी दिशा मिळाली आणि वंचित घटकांसाठी शिक्षणाची दारे खुली झाली.
महात्मा फुले यांनी १८७० साली पुण्यात पहिली सार्वजनिक शिवजयंती साजरी करून इतिहासाला नवे वळण दिले. यापूर्वी १८६९ मध्ये त्यांनी रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी शोधून काढली होती. त्यानंतर शिवरायांचे कार्य जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी शिवजयंती उत्सवाची परंपरा सुरू केली. समाजासाठी आयुष्य अर्पण करणाऱ्या अशा महान व्यक्तिमत्त्वांचे कार्य सदैव प्रेरणादायी ठरते, असे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.
या कार्यक्रमाला महानगर अध्यक्ष ईजाज मलिक, जिल्हा समन्वयक विकासदादा पवार, माजी महानगर अध्यक्ष अशोक लाडवंजारी, युवक महानगर अध्यक्ष विनायक पाटील, अल्पसंख्याक जिल्हा अध्यक्ष मजहर पठाण, जिल्हा ज्येष्ठ आघाडीचे अध्यक्ष एस. डी. पाटील, सरचिटणीस सुनिल भैय्या माळी, प्रा. महाडिक, विद्यार्थी युवक जिल्हा अध्यक्ष गौरव वाणी, अकिल पटेल तसेच इतर पदाधिकारी आणि ज्येष्ठ कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन आणि आभार प्रदर्शन जिल्हा सरचिटणीस वाय. एस. महाजन यांनी मानले.



