Home प्रशासन चिनावल ग्रामपंचायतीत महात्मा गांधी तंटामुक्ती कार्यालयाचे उद्घाटन 

चिनावल ग्रामपंचायतीत महात्मा गांधी तंटामुक्ती कार्यालयाचे उद्घाटन 


सावदा – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी ।  चिनावल ग्रामपंचायतीने एक ऐतिहासिक पाऊल उचलत गावात महात्मा गांधी तंटामुक्ती कार्यालय स्थापन केले असून, या कार्यालयाचे उद्घाटन आज दिनांक ३१ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी १०.३० वाजता उत्साहात पार पडले. सावदा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल पाटील यांच्या हस्ते आणि ग्रामपंचायत सरपंच सौ. ज्योती संजय भालेराव यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमात ग्रामस्थांचा मोठा सहभाग पाहायला मिळाला.

सावदा पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रातील ३२ गावांपैकी चिनावल ही पहिली ग्रामपंचायत ठरली आहे जिथे महात्मा गांधी तंटामुक्तीचे स्वतंत्र कार्यालय सुरू करण्यात आले आहे. या कार्यालयामुळे गावात उद्भवणाऱ्या छोट्या-मोठ्या वादविवादांचे निपटारे गावपातळीवरच शांततेत करता येणार आहेत. यामुळे गावातील सामाजिक सलोखा आणि शांतता अधिक बळकट होण्यास मदत होईल, असे प्रतिपादन सपोनि विशाल पाटील यांनी केले.

कार्यक्रमात महात्मा गांधी तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष जितेंद्र नेमाडे, पोलीस पाटील निलेश नेमाडे, तनुजा सरोदे, माजी जि.प. सदस्य पुष्पा तायडे, उपसरपंच शाहीनबी शेख, माजी सरपंच भावना बोरोले, माजी जि.प. सदस्य सुरेखा पाटील, माजी सभापती माधुरी नेमाडे, माजी पं.स. सदस्य गोपाळ नेमाडे, माजी सरपंच चंद्रकांत भंगाळे, योगेश बोरोले, उज्वला भंगाळे, सुरेश गारसे, दामोदर महाजन, ठकसेन पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

तसेच पोलीस उपनिरीक्षक राहुल सानप, बिट अंमलदार विनोद पाटील, सुनील जोशी, मझहर पठाण, निलेश बावीस्कर, राजेश बोदडे, मयुर पाटील, राहुल येवले यांच्यासह पोलीस स्टेशनचा कर्मचारी वर्गही कार्यक्रमास उपस्थित होता. यावेळी सपोनि विशाल पाटील यांनी तंटामुक्ती समितीच्या पुढाकाराचे कौतुक करत अध्यक्ष जितेंद्र नेमाडे यांना शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमात गावातील गणेशोत्सव आणि दुर्गोत्सव मंडळांचे पदाधिकारी, ग्रामस्थ, महिलावर्ग आणि युवक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. ग्रामपंचायतीच्या या उपक्रमामुळे गावकऱ्यांना स्थानिक न्यायनिवाडा प्रक्रियेत सुलभता, पारदर्शकता आणि जलद निर्णय मिळण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली.


Protected Content

Play sound