मुंबई-वृत्तसेवा | प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेत महाराष्ट्राने देशात अव्वल स्थान पटकावले असून मागील एक वर्षात राज्यातील १ लाख ८ हजार घरांवर सौरऊर्जा प्रकल्प बसविण्यात आले आहेत. वीज कंपनीच्या सूत्रांनी ही माहिती दिली असून या योजनेला महाराष्ट्रात मोठा प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येत आहे.
देशातील महिना ३०० युनिटपर्यंत वीज वापरणाऱ्या घरगुती ग्राहकांचे वीजबिल शून्य व्हावे तसेच अतिरिक्त वीज विकून त्यांना उत्पन्न मिळावे या उद्देशाने केंद्र सरकारने प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजना सुरू केली आहे. सर्वसामान्य वीज ग्राहकांना थेट लाभ देणाऱ्या या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी राज्य शासनाने सर्व जिल्ह्यांतील वीज कंपनीच्या अधिकाऱ्यांना विशेष सूचना दिल्या आहेत. त्यानुसार राज्यात मोठ्या प्रमाणात सौरऊर्जा प्रकल्प उभारले जात आहेत.

केंद्र सरकारने १ ऑक्टोबर २०२५ ते २७ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत योजनेच्या अंमलबजावणीचा आढावा घेतला. या कालावधीत महाराष्ट्रात सर्वाधिक १.०८ लाख घरांवर सौरऊर्जा प्रकल्प बसविण्यात आले आहेत. त्यानंतर उत्तर प्रदेशमध्ये ९५ हजार, गुजरातमध्ये ९४ हजार, राजस्थानमध्ये ३९ हजार तर केरळमध्ये ३६ हजार घरांवर सौरऊर्जा प्रकल्प बसविण्यात आले आहेत.
देशभरात या कालावधीत एकूण ५ लाख ५७ हजार २२४ घरांमध्ये सौरऊर्जा प्रकल्प उभारण्यात आले असून त्यापैकी सुमारे १९ टक्के प्रकल्प महाराष्ट्रात बसविण्यात आले आहेत. या यशस्वी अंमलबजावणीबद्दल केंद्र सरकारने महाराष्ट्र शासनाचे अभिनंदन केले आहे.
या योजनेअंतर्गत सौरऊर्जा प्रकल्प बसविण्यासाठी केंद्र सरकारकडून थेट अनुदान दिले जाते. एक किलोवॅट क्षमतेसाठी ३० हजार रुपये, दोन किलोवॅटसाठी ६० हजार रुपये आणि तीन किलोवॅटसाठी ७८ हजार रुपये इतकी सबसिडी दिली जाते. उर्वरित रक्कम लाभार्थी वीज ग्राहकाने भरायची असते. एक किलोवॅट क्षमतेच्या सौर प्रकल्पातून दरमहा सुमारे १२० युनिट वीज निर्मिती होते.
छतावरील सौरऊर्जा प्रकल्पामुळे ग्राहकाच्या गरजेपेक्षा जास्त वीज निर्माण झाल्यास त्याचे वीजबिल शून्य होते. तसेच अतिरिक्त वीज वीज वितरण कंपनीला विकून ग्राहकाला आर्थिक लाभही मिळू शकतो. एकदा सौरऊर्जा प्रकल्प बसविल्यानंतर त्यातून सुमारे २५ वर्षे वीज निर्मिती होत असल्याची माहिती वीज कंपनीच्या सूत्रांनी दिली आहे.



