Home राजकीय महाराष्ट्राच्या राजकारणाने एक उमदा नेता गमावला- राज ठाकरे

महाराष्ट्राच्या राजकारणाने एक उमदा नेता गमावला- राज ठाकरे


मुंबई-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज वृत्तसेवा । महाराष्ट्राच्या राजकीय जीवनाला हादरवणारी घटना घडत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बारामती येथे विमान अपघातात दुर्दैवी निधन झाले असून, राज्यभरातून शोकभावना व्यक्त केल्या जात आहेत. या दुःखद घटनेनंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सोशल मीडियावर भावूक शब्दांत श्रद्धांजली अर्पण केली असून, त्यांची पोस्ट सध्या मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे.

अजित पवार हे महाराष्ट्राच्या राजकारणातील एक ठाम, स्पष्टवक्ता आणि प्रभावी नेतृत्व म्हणून ओळखले जात होते. मुंबईहून बारामतीकडे जात असताना त्यांचे चार्टर्ड विमान लँडिंगदरम्यान शेतात कोसळले आणि या भीषण अपघातात त्यांचे निधन झाले. ६६ वर्षांच्या अजित पवारांच्या अकस्मात जाण्याने संपूर्ण महाराष्ट्रात शोककळा पसरली असून राजकीय, सामाजिक आणि प्रशासकीय स्तरावर हळहळ व्यक्त होत आहे.

या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी लिहिलेली पोस्ट विशेष लक्ष वेधून घेत आहे. “महाराष्ट्राच्या राजकारणाने एक उमदा नेता गमावला,” असे म्हणत त्यांनी अजित पवारांच्या व्यक्तिमत्त्वावर सविस्तर भाष्य केले आहे. राज ठाकरे यांनी नमूद केले की, अजित पवार आणि त्यांचा राजकारणातील प्रवेश जवळपास एकाच काळातील असला, तरी त्यांचा परिचय नंतर झाला. मात्र राजकारणावर असलेले प्रचंड प्रेम आणि कामाविषयीची तळमळ यामुळे अजित पवारांनी महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी झेप घेतली, असे त्यांनी म्हटले आहे.

राज ठाकरे यांनी आपल्या पोस्टमध्ये अजित पवारांच्या कार्यशैलीचे उदाहरण देताना पिंपरी-चिंचवड आणि बारामतीचा उल्लेख केला आहे. १९९० च्या दशकानंतर शहरीकरण वाढत असताना ग्रामीण-शहरी राजकारणाचा अचूक अंदाज घेऊन त्या भागांचा कायापालट करण्याची किमया अजित पवारांनी साधली, हे त्यांचे राजकीय विरोधकही मान्य करतील, असे राज ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे.

प्रशासनावर असलेली त्यांची मजबूत पकड आणि फाईल्समधील गुंते अचूकपणे सोडवण्याची क्षमता यामुळे ते एक वेगळे नेतृत्व ठरले, असेही राज ठाकरे म्हणाले. सत्तेपेक्षा प्रशासन वरचढ ठरत असलेल्या काळात असा नेता महाराष्ट्राने गमावणे हे दुर्दैवी असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली आहे.

अजित पवारांच्या स्पष्टवक्तेपणावर भाष्य करताना राज ठाकरे यांनी लिहिले की, “काम होणार नसेल तर तोंडावर सांगणं आणि होणार असेल तर त्यासाठी पूर्ण ताकद लावणं,” ही त्यांची खासियत होती. आश्वासनांच्या भोवऱ्यात लोकांना अडकवण्याचा त्यांचा स्वभाव नव्हता. राजकारणातील सडेतोडपणा आणि स्पष्टवक्तेपणाची किंमत मोजावी लागते, हे अनुभवाने माहीत असल्याने अजित पवारांनीही ती किंमत किती दिली असेल, याची जाणीव असल्याचे राज ठाकरे यांनी नमूद केले.

जातीयतेपासून दूर राहून राजकारण करण्याचे धाडस अजित पवारांनी दाखवले, हे त्यांचे आणखी एक महत्त्वाचे वैशिष्ट्य असल्याचे राज ठाकरे यांनी अधोरेखित केले. राजकीय विरोध हा वैयक्तिक नसतो, हे भान जपणारे आणि दिलदार विरोधक म्हणून वावरणारे नेते कमी होत चालले आहेत, आणि अशा नेत्यांच्या जाण्याने महाराष्ट्राच्या उमद्या राजकारणाचे मोठे नुकसान होत असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

दरम्यान, अजित पवार यांच्या निधनामुळे राज्याच्या राजकीय आणि सामाजिक जीवनात कधीही न भरून निघणारी पोकळी निर्माण झाली आहे. प्रशासनावरील वचक, विकासाची स्पष्ट दृष्टी आणि निर्भीड भूमिका यामुळे ते जनसामान्यांमध्ये लोकप्रिय होते. बारामती आणि पिंपरी-चिंचवडच्या विकासाचा शिल्पकार आज काळाच्या पडद्याआड गेला असून, संपूर्ण महाराष्ट्र त्यांना श्रद्धांजली अर्पण करत आहे.


Protected Content

Play sound