जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । राज्याचे उपमुख्यमंत्री आणि धडाडीचे, स्पष्टवक्ते नेतृत्व म्हणून ओळखले जाणारे अजित पवार यांच्या विमान अपघातातील निधनाची बातमी महाराष्ट्रासाठी अत्यंत धक्कादायक ठरली आहे. या घटनेमुळे संपूर्ण राज्य शोकसागरात बुडाले असून, राजकीय, सामाजिक आणि प्रशासकीय क्षेत्रातून तीव्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

अजित पवार हे गेल्या चार दशकांपासून महाराष्ट्राच्या राजकारणावर ठसा उमटवणारे प्रभावी नेते होते. त्यांच्या राजकीय कारकिर्दीत त्यांनी निर्णयक्षम नेतृत्व, प्रशासनावरची मजबूत पकड आणि थेट बोलण्याची शैली यामुळे वेगळी ओळख निर्माण केली होती. कोणत्याही विषयावर स्पष्ट भूमिका मांडणे आणि कामासाठी तात्काळ कृती करणे, ही त्यांची खासियत होती.

अनेक राजकीय कार्यक्रमांच्या निमित्ताने जळगाव जिल्ह्यात भेटी होत असताना अजित पवार हे शेती, सहकार आणि ग्रामीण विकासाबाबत आवर्जून माहिती घेत असत, अशी आठवण माजी खासदार डॉ. उल्हास पाटील यांनी व्यक्त केली आहे. जळगावसारख्या कृषिप्रधान जिल्ह्याच्या प्रश्नांबाबत ते नेहमीच संवेदनशील होते आणि शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घेण्याचा प्रयत्न करीत असत, असेही त्यांनी नमूद केले.
सकाळी सहा वाजताही सर्वसामान्य नागरिकांना भेटणारा नेता म्हणून अजित पवार ओळखले जात होते. वेळेचं काटेकोर पालन, कामातील शिस्त आणि निर्णयांची अंमलबजावणी करण्याची क्षमता यामुळे ते प्रशासनातही प्रभावी ठरले. शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी काढलेल्या संघर्ष यात्रेचे नेतृत्व त्यांनी स्वतः केले होते, हे त्यांच्या सामाजिक बांधिलकीचे प्रतीक मानले जाते.
अजित पवार यांच्या निधनाचे वृत्त मनाला चटका लावणारे असून, राज्याच्या राजकारणात एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे, अशी भावना डॉ. उल्हास पाटील यांनी व्यक्त केली. “दादांसारखे स्पष्टवक्ते, कणखर आणि कामावर विश्वास ठेवणारे नेतृत्व पुन्हा होणे नाही,” असे सांगत त्यांनी अजित पवारांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.



