Home राज्य जागतिक पर्यटन व्यासपीठावर महाराष्ट्राचा उमटला ठसा

जागतिक पर्यटन व्यासपीठावर महाराष्ट्राचा उमटला ठसा


मुंबई-वृत्तसेवा | दक्षिण आशियातील अग्रगण्य बी२बी प्रवास व पर्यटन प्रदर्शन SATTE 2026 (South Asia’s Travel & Tourism Exchange) च्या ३२व्या आवृत्तीत महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन विभागाने दमदार उपस्थिती नोंदवली. SATTE 2026 हे प्रदर्शन २५ ते २७ फेब्रुवारी २०२६ दरम्यान नवी दिल्ली येथील यशोभूमी, इंडिया इंटरनॅशनल कन्व्हेन्शन अँड एक्स्पो सेंटर येथे पार पडले. तीन दिवस चाललेल्या या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या प्रदर्शनात महाराष्ट्र पर्यटन विभागाने उभारलेल्या विशेष दालनाने देश-विदेशातील पर्यटक, गुंतवणूकदार आणि पर्यटन व्यावसायिकांचे विशेष लक्ष वेधून घेतले.

या प्रदर्शनाचे आयोजन Informa Markets यांनी केले होते. ५० हून अधिक देश आणि २८ राज्यांतील पर्यटन मंडळांनी सहभाग घेतल्याने हे व्यासपीठ जागतिक पर्यटन व्यवसायासाठी महत्त्वाचे ठरले. महाराष्ट्र पर्यटन विभागाच्या दालनाचे उद्घाटन संबंधित अधिकाऱ्यांच्या हस्ते करण्यात आले.

महाराष्ट्राच्या दालनात एलईडी स्क्रीनच्या माध्यमातून राज्यातील विविध पर्यटन स्थळांची प्रभावी माहिती सादर करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या ऐतिहासिक गड-किल्ल्यांपासून कोकण किनारपट्टीच्या निसर्गसौंदर्यापर्यंत, वन्यजीव पर्यटन, तीर्थक्षेत्रे, शहरी पर्यटन तसेच माईस क्षेत्रातील वाढत्या संधींचे सादरीकरण करण्यात आले. राज्याचा समृद्ध वारसा आणि आधुनिक पर्यटनाची सांगड घालणारी मांडणी उपस्थितांना भावली.

महाराष्ट्राचे पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी सांगितले की, “SATTE आणि दिल्ली रोडशोमधील महाराष्ट्राचा सहभाग राज्याला जागतिक पर्यटन नकाशावर अधिक प्रभावीपणे अधोरेखित करत आहे. ऐतिहासिक वारसा, कोकण किनारपट्टी, वन्यजीव आणि शाश्वत पर्यटनाच्या माध्यमातून आम्ही जगभरातील पर्यटकांना महाराष्ट्रात येण्याचे आमंत्रण देत आहोत. गुंतवणूकदारांसाठीही या प्रदर्शनातून नवी दालने खुली झाली आहेत.”

पर्यटन संचालनालयाचे सहसंचालक संतोष जाधव यांनी नमूद केले की, “राज्याच्या पर्यटन धोरणाला जागतिक स्तरावर पोहोचविण्यासाठी SATTE हे अत्यंत महत्त्वाचे व्यासपीठ आहे. या माध्यमातून राज्यातील गुंतवणूक संधी आणि प्रोत्साहनपर धोरणांची माहिती जागतिक स्तरावर पोहोचविली जात आहे.”

प्रदर्शनाची सुरुवात महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरांचे दर्शन घडविणाऱ्या सादरीकरणाने झाली. त्यानंतर ऐतिहासिक वारसा, आध्यात्मिक स्थळे, विस्तीर्ण समुद्रकिनारे आणि अनुभवात्मक पर्यटन यांचे सविस्तर सादरीकरण करण्यात आले. याचबरोबर आयोजित रोड शोमधून महाराष्ट्रातील पर्यटन प्रतिनिधी आणि दिल्लीतील व्यावसायिकांमध्ये बी२बी बैठकांद्वारे संवाद साधण्यात आला. यामुळे भविष्यातील पर्यटन व्यवसायाला चालना मिळणार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला.

उल्लेखनीय म्हणजे, महाराष्ट्र शासनाचा पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग ३१ मे २००६ रोजी स्थापन झाला असून राज्याच्या सांस्कृतिक वारशाचे जतन आणि पर्यटन क्षेत्राची वृद्धी हा विभागाचा प्रमुख उद्देश आहे. सांस्कृतिक जतन आणि पर्यटन विकास यांचा समन्वय साधून राज्याच्या सामाजिक व आर्थिक प्रगतीला चालना देण्याचे कार्य विभाग सातत्याने करीत आहे.

एकूणच, SATTE 2026 मधील सहभागामुळे महाराष्ट्र राज्याची पर्यटन क्षेत्रातील ओळख अधिक भक्कम झाली असून ऐतिहासिक वारसा, शाश्वत पर्यटन, माईस आणि किनारी पर्यटनावर विशेष भर देत राज्याने जागतिक स्तरावर आपली छाप उमटवली आहे.


Protected Content

Play sound