जळगाव (प्रतिनिधी) महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीसाठी अनेकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली आहे. महाराष्ट्र राज्याला अनेक थोर राष्ट्र नेत्यांचा वारसा असून आपले राज्य हे या विचारांचा वारसा जपणारे राज्य आहे. त्यामुळेच राज्याने विविध क्षेत्रात प्रगती करुन आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. असे प्रतिपादन राज्याचे महसुल, मदत व पुनवर्सन, सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. चंद्रकांत पाटील यांनी केले.
महाराष्ट्र राज्य स्थापनेचा ५९ व्या वर्धापन दिनानिमित्त जिल्ह्याचा मुख्य शासकीय ध्वजारोहण समारंभ जिल्ह्याचे पालकमंत्री ना. चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते पोलीस कवायत मैदानावर संपन्न झाला. यावेळी उपस्थितांना शुभेच्छा देतांना ना. पाटील बोलत होते. यावेळी महापौर सिमाताई भोळे, जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन. पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले, जळगाव शहर महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. उदय टेकाळे, अपर पोलीस अधीक्षक लोहित मतानी, अपर जिल्हाधिकारी गोरक्ष गाडीलकर, प्रशिक्षणार्थी उपविभागीय पोलीस अधिकारी निलभ रोहन, जळगाव वन विभागाचे उप वनसंरक्षक दिगंबर पगार, निवासी उपजिल्हाधिकारी वामन कदम, उपजिल्हाधिकारी (महसूल) रविंद्र भारदे, उपजिल्हाधिकारी (रोहयो) श्रीमती शुभांगी भारदे, उप जिल्हा निवडणूक अधिकारी तुकाराम हुलवळे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिक्षक अभियंता प्रशांत सोनवणे, यांचेसह स्वातंत्र्य सैनिक, सामाजिक, राजकीय कार्यकर्ते, पदाधिकारी, विविध विभागांचे प्रमुख अधिकारी, कर्मचारी व नागरीक मोठया संख्येने उपस्थित होते.
यावेळी पालकमंत्री पुढे म्हणाले की, आपल्या महाराष्ट्राचा ऐतिहासिक, सांस्कृतिक, सामाजिक वारसा फार मोठा आहे. देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी आणि त्यानंतरही देशाच्या प्रत्येक विधायक उपक्रमात महाराष्ट्राने हिरीरीने सहभाग घेतला आहे. प्राचीन संस्कृतीचा वारसा जपण्यासाठी आपल्या महाराष्ट्राचे महत्वपूर्ण योगदान आहे. महाराष्ट्राचा धार्मिक, सामाजिक सुधारणांचा इतिहास प्रेरणादायी असून राज्याचे विविधांगी भावविश्व थक्क करणारे आहे. महाराष्ट्र ही संत-महंत, ऋषि-मुनींची जशी भूमी आहे तशीच ती शूरवीरांचीही भूमी आहे. या भूमीला पराक्रमाची, त्यागाची, देशप्रेमाची परंपरा लाभली आहे. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, थोर समाज सुधारक महात्मा ज्योतिबा फुले, सामाजिक समतेचा पाया रचणारे छत्रपती शाहू महाराज, भारताला लोकशाहीची देणं देणारे भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासह सर्व थोर राष्ट्र नेत्यांच्या विचारांचा वारसा जपणारे राज्य असल्याचेही ते यावेळी म्हणाले.
पोलीस कवायत मैदान येथे सकाळी आठ वाजता ना. पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करुन राष्ट्रध्वजाला मानवंदना देण्यात आली. त्यानंतर शानदार संचलन करण्यात आले. त्यात जिल्हा पोलीस दल, होमगार्ड पुरुष व महिला पथक, शहर वाहतुक शाखा, बॉम्ब शोधक पथक, पोलीस बॅण्ड पथक, वरुण पथक, जळगाव शहर महानगरपालिकेचे अग्निशमन पथक, निर्भया पथकांनी संचलनात सहभाग घेतला. या संचलनाचे नेतृत्व कमांडिग ऑफिसर भुसावळ उप विभागाचे पोलीस उपअधिक्षक गजानन राठोड यांनी केले. तर सेकंड कमांडिग ऑफीसर राखीव पोलीस निरिक्षक सुभाष कावरे हे होते. यावेळी काशिनाथ पलोड शाळेच्या विद्यार्थ्यांनी पोल मल्लखांब, सेंट टेरेसा शाळेच्या विद्यार्थीनींनी रोप मल्लखांब तर योग शिक्षिका अनिता पाटील यांच्या विद्यार्थ्यांनी रिदमिक योगा सादर करुन उपस्थितांच्या डोळ्यांची पारणे फेडली. त्यानंतर पालकमंत्री ना. पाटील यांनी उपस्थित स्वातंत्र्यसैनिक व मान्यवरांना भेटून शुभेच्छा दिल्या. या सोहळ्याचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. गयाज उस्मानी आणि राजेश यावलकर यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजारोहण
महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या वर्धापनदिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजारोहण करुन राष्ट्रध्वजास मानवंदना देण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी अपर जिल्हाधिकारी गोरक्ष गाडीलकर, निवासी उपजिल्हाधिकारी वामन कदम, उपजिल्हाधिकारी (महसूल) रविंद्र भारदे, उपजिल्हाधिकारी (रोहयो) श्रीमती शुभांगी भारदे, उप जिल्हा निवडणूक अधिकारी तुकाराम हुलवळे, जिल्हा विज्ञान व सुचना अधिकारी प्रमोद बोरोले यांचेसह महसुल विभागाचे अधिकारी, विभागप्रमुख, कर्मचारी आदी उपस्थित होते. यावेळी आदर्श तलाठी पुरस्कार प्राप्त श्री. विनायक राजाराम मानखुंबरे, सजा भातखेडा, ता. एरंडोल यांचा जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीच्या आवारात ध्वजारोहण
मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीच्या आवारातही महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या वर्धापनदिनानिमित्त ध्वजारोहण करुन राष्ट्रध्वजास मानवंदना देण्यात आली. यावेळी जळगाव वन विभागाचे उप वनसंरक्षक दिगंबर पगार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी मुद्रांक जिल्हाधिकारी श्री. विजय भालेराव, कृषि उपसंचालक अनिल भोकरे, जिल्हा माहिती अधिकारी विलास बोडके, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी रमेश काटकर, सह दुय्यम निबंधक सुनील पाटील यांचेसह प्रशासकीय इमारतीतील सर्व कार्यालयांचे प्रमुख, विभागप्रमुख, कर्मचारी आदी उपस्थित होते.