Home Cities जळगाव जवान जावेद अहमद यांना महाराष्ट्र गौरव पुरस्कार 

जवान जावेद अहमद यांना महाराष्ट्र गौरव पुरस्कार 


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । महाराष्ट्र गौरव पुरस्कार योजनेअंतर्गत देशाच्या सुरक्षेसाठी लढताना अपंगत्व आलेल्या जवानांना आर्थिक मदत देण्याच्या निर्णयानुसार जळगाव जिल्ह्यातील जावेद अहमद शेख अमीन यांना ६० लाख रुपयांची मदत मंजूर करण्यात आली आहे. त्यांच्या अदम्य धैर्य आणि कर्तव्यनिष्ठेची दखल घेत राज्य शासनाने हा सन्मान जाहीर केला असून जिल्ह्यात अभिमानाची भावना व्यक्त होत आहे.

सामान्य प्रशासन विभागाच्या शासन निर्णय क्रमांक मासैम-2025/ प्र.क्र.311/28 दिनांक 31 मार्च 2026 नुसार युद्ध, युद्धजन्य परिस्थिती तसेच देशांतर्गत सुरक्षा मोहिमेत जखमी झालेल्या किंवा अपंगत्व आलेल्या जवानांना आर्थिक सहाय्य देण्याची तरतूद करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत चाळीसगाव तालुक्यातील पिलखोड गावचे रहिवासी आणि 179 सीआरपीएफ बटालियनमध्ये कार्यरत असलेले कॉन्स्टेबल चालक जावेद अहमद शेख अमीन यांची निवड करण्यात आली.

जम्मू-काश्मीरमधील बारामुला जिल्ह्यातील अत्यंत संवेदनशील भागात त्यांची नियुक्ती होती. त्यांच्या युनिटवर सोपोर परिसरात कायदा व सुव्यवस्था राखण्याची महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात आली होती. 18 एप्रिल 2020 रोजी ते शासकीय वाहनातून युनिटसाठी आवश्यक साहित्य घेऊन जात असताना अहदबाबा क्रॉसिंगजवळ लपून बसलेल्या उग्रवाद्यांनी त्यांच्या वाहनावर अचानक अंदाधुंद गोळीबार केला. या भीषण हल्ल्यात गंभीर जखमी होऊनही त्यांनी धैर्याने वाहन सुरक्षित स्थळी नेले आणि आपली जबाबदारी पूर्ण केली.

या घटनेत त्यांच्या डाव्या हाताला अतिगंभीर दुखापत झाली असून उपचारानंतरही त्यांना ७४ टक्के अपंगत्व आले आहे. तरीही ते आजही सीआरपीएफमध्ये कार्यरत राहून आपले कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडत आहेत, ही बाब विशेष उल्लेखनीय ठरत आहे. त्यांच्या या शौर्यकथेने अनेकांना प्रेरणा दिली आहे.

जावेद अहमद यांच्या या पराक्रमाची दखल घेत महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र गौरव पुरस्कार योजनेअंतर्गत ६० लाख रुपयांची आर्थिक मदत मंजूर केली आहे. या मदतीचा धनादेश राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी रोहन घुगे तसेच जिल्ह्यातील अन्य मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमात त्यांना शाल व श्रीफळ देऊन सन्मानित करण्यात आले.

या प्रसंगी मेजर (डॉ.) निलेश पाटील, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, संजय रामराव गायकवाड, सहाय्यक जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, विश्वनाथ उगले, मारुती घुगे, समाधान धनगर तसेच जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयातील विनायक महाजन, रतिलाल महाजन, सुगन पाटील, सुभाष चौधरी, मनोज कापले, शेख मोहम्मद आदी उपस्थित होते.


Protected Content

Play sound