Home Cities पारोळा नदीजोड फिडर कालवा सुरू करण्यासाठी महाराष्ट्र शेतकरी संघटनेचे ५ मार्चपासून बेमुदत उपोषण

नदीजोड फिडर कालवा सुरू करण्यासाठी महाराष्ट्र शेतकरी संघटनेचे ५ मार्चपासून बेमुदत उपोषण


पारोळा-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगाव जिल्ह्यात सन २००९-१० दरम्यान राबविण्यात आलेल्या नदीजोड प्रकल्पांपैकी अनेक प्रकल्प अपूर्ण किंवा चुकीच्या पद्धतीने झाल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. पारोळा तालुक्यातील बाहुटे, कन्हेरे, तुराडखेडे, मराठखेडे, सावखेडे आणि भालगाव धरण परिसरासाठी गिरणा कालव्यातून प्रस्तावित नदीजोड फिडर कालवा त्वरित सुरू करावा, या प्रमुख मागणीसाठी महाराष्ट्र शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे.

या मागणीसाठी संघटनेतर्फे ४ फेब्रुवारी २०२६पासून निवेदने देत जिल्हास्तरावर सातत्याने पाठपुरावा करण्यात येत आहे. संबंधित कालवा सुरू झाल्यास वरील गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लागेल, तसेच हजारो हेक्टर जमीन बागायती होऊन भूजलपातळीत मोठी वाढ होईल, असा संघटनेचा दावा आहे.

मात्र प्रशासनाकडून मागण्यांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत संघटनेने आंदोलनाचा इशारा दिला आहे. गिरणा कालव्यातून भालगाव कालव्यात पाणी सोडले जाणाऱ्या ठिकाणी ५ मार्च रोजी सकाळी १० वाजता गिरणेच्या वाहत्या पाण्यात बसून बेमुदत उपोषण सुरू करण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे.

हे उपोषण महाराष्ट्र शेतकरी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा शेतकरी नेते सुनील देवरे यांच्या नेतृत्वाखाली होणार आहे. या आंदोलनात लाभार्थी शेतकरी, संघटनेचे पदाधिकारी, ज्येष्ठ नागरिक, महिला-पुरुष तसेच युवक-युवती मोठ्या संख्येने सहभागी होणार असल्याचे सांगण्यात आले. जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाहीत, तोपर्यंत उपोषण मागे घेण्यात येणार नाही, असा इशाराही संघटनेने दिला आहे.

उपोषणादरम्यान कोणतीही जीवितहानी झाल्यास त्यास शासन, प्रशासन, संबंधित अधिकारी-कर्मचारी तसेच संबंधित कामाचा मक्तेदार जबाबदार राहतील, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

सदर निवेदन नायब तहसीलदार अश्विनी मराठे यांना देण्यात आले. यावेळी तालुका कार्याध्यक्ष गुलाब पाटील, कायदा सुव्यवस्था समितीचे तालुकाध्यक्ष दिलीप पाटील, मृद व जलसंधारण समितीचे तालुकाध्यक्ष एस. झेड. पाटील, युवाध्यक्ष निरंजन पाटील, बहादूर गण प्रमुख शांताराम पाटील, महाळपूर शाखाध्यक्ष गणेश पाटील यांच्यासह अन्य पदाधिकारी व शेतकरी उपस्थित होते.

संघटनेच्या प्रमुख मागण्यांमध्ये पारोळा तालुक्यातील बाहुटे, कन्हेरे, तुराडखेडे, मराठखेडे, सावखेडे आणि भालगाव धरण परिसरासाठी गिरणा कालव्यातून नदीजोड फिडर कालवा त्वरित सुरू करून भालगाव धरण भरण्यात यावे तसेच जळगाव जिल्ह्यातील सर्व नदीजोड प्रकल्प तत्काळ सुरू करण्यात यावेत, यांचा समावेश आहे.


Protected Content

Play sound