पारोळा – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । पारोळा तालुक्यात अलीकडील आठवड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे कापूस, मका, सोयाबीन, ज्वारी, केळी अशा विविध पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शेतकरी संघटनेच्या वतीने राष्ट्रीय अध्यक्ष व शेतकरी नेते सुनील देवरे यांच्या नेतृत्वाखाली पारोळा येथील तहसीलदार डॉ. उल्हास देवरे यांना नुकसान भरपाईसाठी निवेदन सादर करण्यात आले.
शेतकरी संघटनेने सादर केलेल्या निवेदनात नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी सरसकट पंचनामे करावेत, अशा मागणीचा ठाम आवाज उठवण्यात आला. सध्या काही महसूल व कृषी विभागाचे अधिकारी “शेतात पाणी साचलेले दिसल्यासच पंचनामा करू” अशी अजब भूमिका घेत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले. प्रत्यक्षात अतिवृष्टी थांबून काही दिवस उलटले असल्यामुळे पाणी शेतात साचलेले नसले तरी, पिकांची हानी झालेली आहे. विशेषतः कापूस पिकाचे बोंड सडून गेले असून, उरलेला थोडाफार माल सुद्धा झाडावरून गळून गेलेला आहे. झाडांची वाढ थांबली असून उत्पादनाची कोणतीही शक्यता उरलेली नाही.

या पार्श्वभूमीवर, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचा पंचनामा तत्काळ करावा आणि प्रत्येक शेतकऱ्याला हेक्टरी ५० हजार रुपयांची नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी करण्यात आली. निवेदन देताना शिवरे, आडगाव, तरवाडे परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी शेतकऱ्यांनी वन्य प्राण्यांच्या त्रासामुळे शेती अडचणीत येत असल्याचाही मुद्दा उपस्थित केला. शेती करण्यास वन्य प्राण्यांमुळे अडथळा येत असून शासनाने याबाबतही उपाययोजना कराव्यात, अशी मागणीही करण्यात आली. तहसीलदार डॉ. उल्हास देवरे यांनी निवेदनाची सकारात्मक दखल घेतली असून, नुकसान भरपाई आणि वन्य प्राण्यांच्या समस्येचा प्रश्न शासनाच्या निदर्शनास आणून दिला जाईल, असे आश्वासन दिले.
या निवेदनावर भुराजी कांडेकर, शिवाजी पाटील, नामदेव पाटील, महेंद्र पाटील, पिनू पाटील, भगवान पागरे, नथू पाटील, विजय पाटील, सुभाष पाटील, कारभारी पाटील यांच्यासह अनेक शेतकऱ्यांच्या स्वाक्षऱ्या असून, परिसरातील शेकडो शेतकरी या वेळी उपस्थित होते. शेतकऱ्यांच्या या संघर्षाला आता शासन स्तरावरून कितपत प्रतिसाद मिळतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.



