Home Cities जळगाव मेहरुण परिसरात महाराजस्व समाधान शिबीर

मेहरुण परिसरात महाराजस्व समाधान शिबीर


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । मेहरुण परिसरातील नागरिकांना शासकीय सेवा आणि विविध योजनांचा लाभ सहज मिळावा या उद्देशाने एल.एच. पाटील शाळेत ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर’ तसेच विमुक्त जाती व भटक्या जमातींसाठी ओळखपत्र, प्रमाणपत्र व विविध शासकीय योजनांच्या लाभासाठी विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले. हे शिबिर जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आले होते.

मेहरुण तलावाजवळील वस्तीमध्ये राहणाऱ्या नागरिकांना आवश्यक शासकीय कागदपत्रे सहज उपलब्ध व्हावीत आणि त्यांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळावा, या उद्देशाने या उपक्रमाची अंमलबजावणी करण्यात आली. प्रशासनाच्या या उपक्रमाला स्थानिक नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

शिबिराच्या प्रास्ताविकात जळगावचे प्रांताधिकारी विनय गोसावी यांनी मार्गदर्शन करताना प्रशासन नागरिकांच्या सेवेसाठी सदैव तत्पर असल्याचे सांगितले. शासनाच्या या उपक्रमामुळे गरजू नागरिकांना मोठा दिलासा मिळणार असून शिबिरामध्ये विविध प्रकारचे दाखले व प्रमाणपत्रे देण्यात येत आहेत. काही कारणास्तव कोणतीही त्रुटी राहिल्यास पुढील काळात पुन्हा अशा प्रकारचे शिबिर आयोजित करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

यावेळी संजय गांधी निराधार योजनेबाबत तहसीलदार रुपाली काळे यांनी माहिती देताना निराधार महिलांना शासनाकडून दरमहा १५०० रुपये आणि दिव्यांग निराधारांना २५०० रुपये अनुदान दिले जाते, असे सांगितले. पात्र महिलांनी या शिबिरात नोंदणी करून योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.

या शिबिरात सुमारे ३६ कुटुंबांनी सहभाग नोंदविला. विविध विभागांचे मिळून एकूण १० कक्ष उभारण्यात आले होते. या कक्षांच्या माध्यमातून नागरिकांना आवश्यक मार्गदर्शन, कागदपत्रांची पडताळणी तसेच विविध योजनांची माहिती देण्यात आली.

शिबिरासाठी तलाठी, महापालिकेचे आरोग्य अधिकारी, संबंधित विभागांचे अधिकारी तसेच अनुलोम संस्थेचे सदस्य उपस्थित होते. प्रशासनाच्या या उपक्रमामुळे भटक्या-विमुक्त समाजातील नागरिकांना आवश्यक प्रमाणपत्रे व योजनांचा लाभ मिळण्यास मोठी मदत होणार असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.


Protected Content

Play sound