चोपडा-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील मंगरूळ येथे महाशिवरात्रीच्या पवित्र पर्वानिमित्त महादेव मंदिरात भाविकांची उत्स्फूर्त गर्दी पाहायला मिळाली. पहाटेपासूनच हर हर महादेवच्या जयघोषात मंदिर परिसर दुमदुमून गेला असून, दिवसभरात सुमारे चार क्विंटल फराळाचा महाप्रसाद भाविकांना वितरित करण्यात आला.
मंगरूळ येथील महादेव मंदिरात महाशिवरात्री निमित्त विशेष पूजाअर्चा, अभिषेक आणि आरतीचे आयोजन करण्यात आले होते. पहाटे काकड आरतीनंतर भाविकांनी दर्शनासाठी लांबच लांब रांगा लावल्या होत्या. सकाळपासून सायंकाळपर्यंत मंदिर परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. ग्रामस्थांसह परिसरातील गावांमधूनही मोठ्या संख्येने भाविकांनी हजेरी लावली.

भाविकांसाठी महाप्रसाद म्हणून साबुदाण्याची खिचडी, साबुदाणा चिवडा, राजगिरा लाडू आणि उकळलेले रताळू यांचा समावेश असलेला फराळ वाटप करण्यात आला. उपवासाच्या दिवशी योग्य आहार मिळावा यासाठी स्वच्छता व दर्जा यांची विशेष काळजी घेण्यात आली. सुमारे चार क्विंटल फराळाचे नियोजन करून दिवसभरात येणाऱ्या प्रत्येक भाविकाला महाप्रसाद देण्यात आला.
या उपक्रमासाठी अक्षय ठाकरे, मनीष निकम, आदित्य निकम, जुगल निकम, पीयूष निकम आणि योगराज मोरे यांनी पुढाकार घेतला होता. युवकांनी स्वयंप्रेरणेने नियोजन, साहित्य खरेदी, स्वयंपाक व वितरण यामध्ये सक्रिय सहभाग नोंदवला. ग्रामस्थांनीही सहकार्य करून कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मोलाची भूमिका बजावली.
मंदिर परिसरात शिस्तबद्ध व्यवस्था, पिण्याच्या पाण्याची सोय आणि भाविकांच्या सोयीसाठी आवश्यक नियोजन करण्यात आले होते. दिवसभर कोणतीही अडचण निर्माण न होता कार्यक्रम उत्साहात आणि भक्तिभावात पार पडला.



