Home Cities जामनेर आंबीलहोळ येथे महास्वच्छता अभियान उत्साहात

आंबीलहोळ येथे महास्वच्छता अभियान उत्साहात

0
110

जामनेर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त, तसेच आगामी महात्मा गांधी जयंतीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षातर्फे “सेवा पंधरवडा” साजरा करण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत जामनेर तालुक्यातील आंबीलहोळ गावात महास्वच्छता अभियान राबवण्यात आले, ज्याला ग्रामस्थ व कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

या अभियानादरम्यान मंदिर परिसर, रस्ते, ग्रामपंचायत कार्यालय परिसर याठिकाणी स्वच्छता मोहीम राबवून सार्वजनिक ठिकाणे स्वच्छ करण्यात आली. गावातील अनेक युवक, पदाधिकारी आणि नागरिकांनी या उपक्रमात सहभागी होत “स्वच्छता ही सेवा” या संकल्पनेला बळकटी दिली. प्लास्टिक कचरा उचलणे, रस्त्यांची झाडून सफाई करणे, निर्जंतुक फवारणी करणे असे विविध उपक्रम करण्यात आले.

या स्वच्छता मोहिमेला माजी जिल्हा परिषद सदस्य विलास पाटील, भाजपचे पूर्व मंडळ अध्यक्ष मयूर पाटील, आनंद लावरे, अशोक भोईटे, राजेश पाटील, रामकिसन नाईक, रमेश नाईक, निलेश चव्हाण यांसह भाजपचे स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले. गावातील नागरिकांनीही उत्साहाने सहभाग नोंदवून या उपक्रमाचे महत्त्व अधोरेखित केले.

सामाजिक जबाबदारी आणि स्वच्छतेबाबत जनजागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने राबवण्यात आलेल्या या अभियानामुळे गावात सकारात्मक ऊर्जा पसरली आहे. नरेंद्र मोदींच्या कार्यपद्धतीप्रमाणेच “स्वच्छ भारत, सक्षम भारत” या ध्येयाचा प्रत्यक्ष अनुभव या उपक्रमातून मिळाल्याचे मत अनेक ग्रामस्थांनी व्यक्त केले.


Protected Content

Play sound