जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | जिल्ह्यात नवनवीन छोटे-मोठे उद्योग यावेत आणि युवकांना मोठ्या प्रमाणात रोजगार मिळावा यासाठी शासन प्रयत्नशील आहे. उद्योजक समाधानी असतील तर जिल्हा समाधानी राहील, आणि उद्योग क्षेत्राचा विकास झाला तर जिल्ह्याचाही सर्वांगीण विकास होईल, असे प्रतिपादन राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले.

जिल्हा उद्योग केंद्र, जळगाव यांच्या वतीने शासनामार्फत केंद्र सरकारच्या “जिल्हा जळगाव हे निर्यात केंद्र” या कार्यशाळेचे उद्घाटन पालकमंत्री पाटील यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाला खासदार स्मिता वाघ, आमदार सुरेश भोळे, उद्योग सहसंचालक श्रीमती वृषाली सोनी, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक संतोष गवळी आदी मान्यवर उपस्थित होते.

पालकमंत्री पाटील म्हणाले की, जळगाव जिल्ह्याला औद्योगिक क्षेत्रात ‘डी प्लस’ क्षेत्राचा दर्जा मिळाल्याने नवीन उद्योगांना मोठी चालना मिळणार आहे. राज्याच्या औद्योगिक धोरणामुळे जिल्ह्यासाठी ही सुवर्णसंधी असून विकासाची गती वाढेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. हा दर्जा मिळवण्यासाठी सर्व उद्योजक, लोकप्रतिनिधी व राज्य नेतृत्वाचे सहकार्य लाभले, याचा त्यांनी उल्लेख केला.
औद्योगिक प्रशिक्षण घेतलेल्या युवकांनी नवीन उद्योग सुरू करण्यासाठी बँकांनी सकारात्मक सहकार्य करावे, तसेच शासन स्तरावरूनही लघुउद्योगांना चालना देण्यासाठी प्रयत्न सुरू राहतील, असे त्यांनी सांगितले. जिल्ह्यातील केळी उद्योगाला प्रोत्साहन देण्यासाठी अंगणवाड्यांच्या पोषण आहारात केळीचा समावेश करण्याचा प्रयत्न केला जाईल, अशी माहिती त्यांनी दिली. दर तीन महिन्यांनी उद्योजक व लोकप्रतिनिधींची संयुक्त बैठक घेण्याच्या सूचना त्यांनी संबंधित विभागाला दिल्या.
खासदार स्मिता वाघ यांनी उद्योजकांना मूलभूत सुविधा मिळाल्याशिवाय उद्योगवाढ शक्य नसल्याचे सांगितले. छोटे उद्योग टिकून राहणे तितकेच महत्त्वाचे असून त्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी सातत्याने प्रयत्न व्हावेत, असे त्या म्हणाल्या. जळगाव विमानतळावर कार्गो सेवा सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी नमूद केले.
आमदार सुरेश भोळे यांनी जळगाव शहरातील उद्योजकांच्या अडचणी सोडवण्यावर भर देत औद्योगिक सुरक्षेसाठी अद्ययावत अग्निशमन यंत्रणा उभारण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले.
जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी प्रशासनातर्फे उद्योगवाढीसाठी विविध उपक्रम सुरू असल्याची माहिती दिली. बेरोजगार युवकांना नोकरी व व्यवसायाच्या संधींबाबत माहिती देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात लवकरच माहिती कक्ष सुरू केला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रास्ताविकात उद्योग सहसंचालक श्रीमती वृषाली सोनी यांनी या कार्यशाळेचा उद्देश स्पष्ट करताना निर्यातक्षम उत्पादनांना प्रोत्साहन देणे, रोजगारनिर्मिती वाढवणे आणि जिल्ह्यांना निर्यात क्षेत्रात अधिक सक्षम बनवणे हे ध्येय असल्याचे सांगितले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेंतर्गत बँकांनी मंजूर केलेल्या चार मालवाहू ई-रिक्षांचे वाटप पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमास उद्योजक, अधिकारी व विविध क्षेत्रातील प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



