जळगाव प्रतिनिधी । के.सी.ई. सोसायटीच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त निसर्गोपचार विभाग मू.जे. महाविद्यालय आणि माधवबाग कार्डियाक क्लिनिक यांच्या संयुक्त विद्यमाने नि:शुल्क हृदयरोग निदान कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.
सततच्या धावपळीमुळे आणि चुकीच्या दिनचर्येमुळे दिवसेंदिवस मनुष्याचे शारीरिक आणि मानसिक आरोग्य धोक्यात येत आहे. त्यामुळेच हृदयरोगासारखे विविध विकार झपाट्याने वाढत चालले आहेत. अनावश्यक चिंता, काळजी, तणाव इत्यादींमुळे रक्तदाब आणि हृदय रोग यांनी अनेक लोक त्रस्त झालेले आहेत. ह्रदय रोग टाळता येऊ शकतो का? त्याची लक्षणे आणि कारणे कोणती? त्यासाठी काय काळजी घ्यावी? आणि यासाठी काय उपाययोजना करावी? हे समाजापर्यंत पोहोचविण्यासाठी या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.
ही कार्यशाळा शनिवार ३० नोव्हेंबर २०१९ रोजी सकाळी ९ ते १२ या वेळात निसर्गोपचार विभाग, प्राचार्यांच्या बंगल्याच्या बाजूला मू. जे. महाविद्यालय परिसर जळगाव येथे आयोजित करण्यात आली आहे. अशी माहिती सोहम निसर्गोपचार विभागाच्या समन्वयिका निसर्गोपचार तज्ञ प्रा. सोनल महाजन, समन्वयक निसर्गोपचार तज्ञ प्रा. अनंत महाजन आणि माधवबाग परिवाराच्या डॉ. श्रद्धा महाजन यांनी प्रकार परिषदेत दिली. या कार्यशाळेमध्ये माधवबाग मुंबई येथील निसर्गोपचार तज्ञ डॉ. मिलिंद सरदार आणि डॉ. प्रशांत याकुंडी हे हृदय रोगासंबंधी पीपीटी सादरीकरणातून सविस्तर मार्गदर्शन करणार आहेत.
माधवबाग हे जगातील पहिले आयुर्वेदिक हृदयरोग निवारण केंद्र आहे. आतापर्यंत पाच लाखाहून अधिक रुग्णांवर माधवबाग तर्फे यशस्वी उपचार करण्यात आले आहे. रुग्णांच्या सोयीसाठी देशभरात १९० हून अधिक क्लिनिक्स व ५ दिवसाच्या निवासी चिकित्सेची २ हॉस्पिटल्स रुग्णसेवेत कार्यरत आहेत.