लखनौ – वृत्तसेवा । उत्तर प्रदेशची राजधानी लखनौ येथे मोठा दहशतवादी कट उधळण्यात सुरक्षा यंत्रणांना यश आले असून, आयएसआयशी संबंधित असल्याचा संशय असलेल्या चार जणांना अटक करण्यात आली आहे. रेल्वे सिग्नल बॉक्स उडवून मोठा अपघात घडवून आणण्याचा त्यांचा डाव होता, अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेले आरोपी लखनौ रेल्वे स्थानकाजवळील सिग्नल यंत्रणा उडवण्याच्या तयारीत होते. या प्रकरणात उत्तर प्रदेश एटीएसने तातडीने कारवाई करत चौघांना ताब्यात घेतले असून, त्यांच्या चौकशीतून अनेक धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे. या कटाचा उद्देश रेल्वे वाहतूक विस्कळीत करून मोठा अपघात घडवून आणणे हा असल्याचे समजते.

अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये मेरठचा रहिवासी साकिब उर्फ डेविल हा प्रमुख सूत्रधार असल्याचे समोर आले आहे. तो थेट पाकिस्तानमध्ये बसलेल्या आयएसआय हँडलरच्या संपर्कात होता. या हँडलरकडून साकिबला आर्थिक मदत पुरवली जात होती आणि त्याच्यामार्फत इतर तीन साथीदारांना निधी दिला जात होता, असा दावा तपास यंत्रणांनी केला आहे.
एटीएसच्या प्राथमिक तपासात असेही स्पष्ट झाले आहे की, आरोपींनी लखनौ, गाझियाबाद आणि मेरठमधील महत्त्वाच्या ठिकाणांचे फोटो आणि व्हिडीओ तयार करून पाकिस्तानात पाठवले होते. यामध्ये गाड्यांचे शोरूम, गर्दीची ठिकाणे आणि संवेदनशील भागांचा समावेश होता. गॅस सिलिंडरने भरलेल्या ट्रकला आग लावणे तसेच वाहनांच्या शोरूममध्ये स्फोट घडवून आणण्याचाही त्यांचा कट होता.
तपास यंत्रणांनी दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानमधील हँडलर गुगल लोकेशनच्या माध्यमातून सिग्नल बॉक्सचे अचूक ठिकाण साकिबला पाठवत होता. त्यानंतर त्या ठिकाणांचे फोटो आणि व्हिडीओ पुन्हा पाकिस्तानात पाठवले जात होते. या पद्धतीने सिग्नल यंत्रणा जाळून रेल्वे अपघात घडवण्याची योजना आखण्यात आली होती.
दरम्यान, पाकिस्तानमधील हँडलर आरोपींना विविध दहशतवादी विचारसरणीच्या नावाने चिथावणी देत होता. सोशल मीडियावर शस्त्रांसह साकिबचे व्हिडीओ पाहून त्याचे इतर साथीदार त्याच्या संपर्कात आले होते. तपासात असेही समोर आले आहे की, आरोपींपैकी काही जण थेट परदेशी हँडलरशी संपर्कात होते आणि त्यांच्याकडून निर्देश घेत होते.
सध्या या चौघांनाही एटीएसकडून रिमांडवर घेण्याची प्रक्रिया सुरू असून, विशेष न्यायालयात याबाबत सुनावणी होणार आहे. या प्रकरणामुळे सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या असून, देशातील महत्त्वाच्या ठिकाणांवरील सुरक्षा आणखी कडक करण्यात येण्याची शक्यता आहे.



