जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । महाराष्ट्राच्या राजकीय जीवनाला हादरवणारी बातमी भल्या पहाटे समोर आली आणि संपूर्ण राज्य सुन्न झाले. उपमुख्यमंत्री आणि अभ्यासू नेतृत्व म्हणून ओळखले जाणारे अजितदादा पवार यांच्या अकाली निधनाच्या वृत्ताने महाराष्ट्रावर शोककळा पसरली असून, विशेषतः तरुण कार्यकर्त्यांमध्ये मोठी पोकळी निर्माण झाली आहे.

अजित पवार हे केवळ एक प्रशासकीय नेता नव्हते, तर तरुण कार्यकर्त्यांसाठी ते कायम आधारवड ठरले. कार्यकर्त्यांवर निस्सीम प्रेम करणारे आणि त्यांच्या प्रश्नांकडे आपुलकीने पाहणारे नेतृत्व अशी त्यांची ओळख होती. कोणताही कार्यकर्ता असो, तो नवखा असो किंवा अनुभवी, अजितदादांकडून त्याला मार्गदर्शन आणि प्रोत्साहन मिळायचे, अशी भावना अनेकांनी व्यक्त केली आहे.

राज्याच्या अर्थकारणात अजित पवार यांचे योगदान अतिशय महत्त्वाचे मानले जाते. महाराष्ट्राचा अर्थसंकल्प सर्वाधिक वेळा मांडण्याचा विक्रम त्यांच्या नावावर आहे. अर्थ व नियोजन मंत्री म्हणून त्यांनी राज्याला आर्थिक शिस्त लावण्याचे काम अत्यंत बारकाईने आणि ठामपणे केले. कठोर निर्णय घ्यावे लागले तरी राज्याच्या हितासाठी ते मागे हटत नसत, असे त्यांच्या सहकाऱ्यांचे म्हणणे आहे.
स्पष्टवक्ता स्वभाव, प्रचंड निर्णयक्षमता आणि निडर नेतृत्व हे अजित पवारांचे प्रमुख व्यक्तीगुण होते. कोणत्याही विषयावर अभ्यासपूर्ण मांडणी करणे आणि थेट भूमिका मांडणे, यामुळे ते राजकीय वर्तुळात वेगळे ठरले. त्यांच्या भाषणांतून आणि निर्णयांतून आत्मविश्वास आणि कामाची तळमळ दिसून यायची.
अजित पवार यांच्या अकाली जाण्याने तरुण कार्यकर्त्यांचा आधारस्तंभच कोसळल्याची भावना भाजपाच्या जिल्हा सरचिटणीस डॉ. केतकी पाटील यांनी व्यक्त केली आहे. “अभ्यासू नेतृत्व, कार्यकर्त्यांवर प्रेम आणि राज्याच्या भविष्यासाठी कठोर निर्णय घेण्याची तयारी असलेला नेता महाराष्ट्राने गमावला आहे,” अशा शब्दांत त्यांनी शोक व्यक्त केला.



