चाळीसगाव, प्रतिनिधी | शहरासह ग्रामीण भागाला जोडणाऱ्या सर्व रस्त्यांवर खड्ड्यांचे प्रमाण वाढले आहे. या खड्ड्यांमुळे प्रल्हाद राठोड व रवींद्र राठोड यांना ३१ ऑक्टोबर रोजी हकनाक जीव गमवावा लागल्याने पुन्हा दुसऱ्या कोणाला आपल्या जीवास मुकावे लागू नये यासाठी मृतांच्या मित्रांनी चाळीसगाव येथील रस्त्यांवरील खड्डे स्वखर्चाने बुजविले.
गेल्या काही दिवसात झालेला अवकाळी पावसाने शहरातील खड्डे अधिक मोठे होऊन अनेक अपघात झाले आहे. चाळीसगाव औरंगाबाद नॅशनल हायवे २११ वर देखील मोठ्या प्रमाणावर खड्डे झाले आहेत. दिनांक ३१ ऑक्टोंबर रोजी चाळीसगाव पोलिस स्टेशन येथे कार्यरत असलेले पोलीस कॉन्स्टेबल प्रल्हाद हिरामण राठोड व व त्यांचे नातेवाईक रवींद्र राठोड यांची खड्ड्यात गाडी गेल्याने मागून आलेल्या कारने त्यांना ठोस मारून अपघात झाला. या अपघातात दोघांना आपले प्राण गमवावे लागलेत. प्रल्हाद राठोड रवींद्र राठोड हे येथील बंजारा विकास युवा मंचचे अध्यक्ष कांतीलाल राठोड व सहकाऱ्यांचे मित्र होते. पुन्हा आणखीन कुठल्या आपल्या मित्राला किंवा प्रवास्यास खड्यांमूळे अपघात होऊ नये व प्राणास मुकावे लागू नये या प्रामाणिक भावनेतून बंजारा विकास मंचने या रस्त्यावरील घाटाच्या पायथ्यापासून ते चाळीसगाव बायपासपर्यंतचे सर्व खड्डे स्वखर्चातून बुजलेत आणि आपल्या मयत मित्राला अनोखी श्रद्धांजली दिली. यावेळी भरतसेठ चव्हाण, सुभाष जाधव, डॉ. संतोष राठोड, संतोष राठोड सुभाषभाऊ राठोड, बद्रीभाऊ चव्हाण, प्रदीप राठोड, योगेश राठोड. अशोक राठोड, साईदास जाधव, पितांबर जाधव, शिवाजी कुराडे, योगेश जाधव विठ्ठल, पप्पू कांतीलाल राठोड हे उपस्थित होते.