जळगाव (प्रतिनिधी) शहरातील विवेकानंद प्रतिष्ठान संचालित ब.गो. शानभाग विद्यालयातील काही विद्यार्थ्यांना यंदाच्या १० वीच्या परीक्षेत बोर्डाकडून कला आणि क्रीडा प्रकारातील प्राविण्यासाठी दिले जाणारे वाढीव गुण न देण्यात आल्याने त्या विद्यार्थ्यांचे नुकसान झाले आहे.
आज दुपारी १० वीच्या परीक्षेचा निकाल ऑनलाईन जाहीर झाल्यानंतर ही बाब उघडकीस आली. त्यानंतर शाळा प्रशासनानेही तातडीने पावले उचलून यासंदर्भात बोर्डाशी संपर्क साधला असल्याचे कळले आहे. ऑनलाईन निकाल बघितल्यानंतर काही विद्यार्थ्यांच्या मार्कशीटमध्ये हे कला आणि क्रीडा क्षेत्रातील प्राविण्यासाठीचे गुण समाविष्ट केल्याचे दिसून आले नाही. त्याचवेळी इतर बऱ्याच विद्यार्थ्यांना तसे गुण दिलेले आढळून आले. हा प्रकार बघताच संबंधित विद्यार्थ्यांच्या पालकांनी शाळेत धाव घेतली आणि शाळा प्रशासनाशी चर्चा करून झालेला प्रकार निदर्शनास आणून दिला. त्यानंतर शाळेनेही तातडीने दाखल घेत नाशिक बोर्डाशी संपर्क साधला व गुण समाविष्ट करण्याचे प्रयत्न सुरु केले आहेत. बोर्डाने या प्रकाराची दखल घेवून विद्यार्थ्यांना त्यांच्या हक्काचे गुण त्वरित समाविष्ट करून द्यावे, अशी मागणी विद्यार्थी व पालकांकडून करण्यात येत आहे.