भुसावळ, प्रतिनिधी | जळगाव जिल्ह्यात गेल्या तीन दिवसापासून पाऊस सुरू असल्याने मका ,कपाशी ,ज्वारी पिकाचे नुकसान झाले आहे. यामुळे शेतकरी हवालदिल झाला असल्याचे दिसून येत आहे.
भुसावळ तालुक्यातील साकरी येथे परतीच्या पावसामुळे कापून ठेवलेली ज्वारी काळी पडली असून प्रत्येक कंसाला कोंब फुटल्याने ज्वारी पिकाचे तसेच कपाशीचे नुकसान झाले असल्याचे साकरी येथील शेतकरी अनिल महाजन यांनी ‘लाईव्ह ट्रेंड्स न्यूज’ शी बोलताना सांगितले. शेतकऱ्याने मरावे की जगावे असा प्रश्न शेतकऱ्यांपुढे निर्माण झाला आहे असे त्यांनी पुढे म्हटले आहे. शासनाने त्वरित पंचनामा करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी त्यांनी केली आहे.
निवडणुकीच्या कामकाजामध्ये तलाठी, तहसीलदार व्यस्त असल्याने पंचनामा कधी होईल व शेतकऱ्यांना कधी नुकसान भरपाई मिळेल असा प्रश्न देखील शेतकरी वर्गाकडून उपस्थित केला जात आहे. आधीच बी बियाणेचे भाव गगनाला भिडल्याने शेतकरी वर्ग कोलमडला आहे. निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकरी हवालदिल झाल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.