एरंडोल येथे भगवान बुद्ध अस्थिदर्शन कार्यक्रम संपन्न

एरंडोल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | श्रीलंकेतील बौद्ध उपासक भारतातील विविध बुद्ध पर्यटन स्थळांना आवर्जून भेटी देत असतात. भारत ही बुद्धाची भूमी आहे. त्यामुळे श्रीलंकेतील लोक भारताकडे अत्यंत आस्थेने पाहतात. भारत त्यामुळेच त्यांच्यासाठी वंदनीय आहे, असे प्रतिपादन श्रीलंकेतील बौद्ध भंते भदंत धम्म सुगत यांनी एरंडोल येथील तथागत गौतम बुद्ध अस्थिदर्शन कार्यक्रम प्रसंगी केले. जगाला शांती, अहिंसा, प्रेम आणि करुणेचा विचार देणाऱ्या तथागत गौतम बुद्धांच्या अस्थी घेऊन भदंत धम्म सुगत श्रीलंकेतून जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेले आहेत. एरंडोल येथील श्रावस्ती पार्क येथे जिल्ह्यातील दुसरा कार्यक्रम एरंडोल येथे संपन्न झाला. तथागत गौतम बुद्ध अस्थिदर्शन कार्यक्रम समितीच्या माध्यमातून सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

बुद्ध विचारांनी माणसाचा अहंकार नष्ट होतो. मनुष्य सर्व प्राणीमात्रावर प्रेम करायला लागतो. त्यामध्ये करुणा उत्पन्न होते. चराचर सृष्टीवर व्यक्ती प्रेम करायला लागतो. त्याच्यातील शत्रूत्व नष्ट होऊन मैत्री भावना जागृत होते आणि यातून एका चांगल्या समाजाची निर्मिती होते, अशाप्रकारे आपल्या एका तासाच्या धम्म देसने मध्ये भदंत धम्म सुुगत यांनी बुद्ध जीवनाच्या अनेक पैलूंना स्पर्श केला. तथागत गौतम बुद्धांच्या अस्थि बुद्ध जयंती व बुद्ध पौर्णिमेनिमित्त ॲड.राजेश झाल्टे व पूज्य भंते नागसेन यांच्या विशेष सहकार्यातून जळगाव जिल्ह्य़ात 25 मे रोजी दाखल झाल्या. त्यातील दुसऱ्या कार्यक्रमाचे आयोजन एरंडोल येथील विखरण रोडवरील श्रावस्ती पार्क येथे धम्मचक्र नगरी बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष भरत शिरसाट व तथागत गौतम बुद्ध अस्थिदर्शन समितीच्या यशस्वी प्रयत्नांतून करण्यात आले होते. पूज्य भदंत धम्म सुगत व पूज्य भदंत नागसेन यांनी उपस्थितांना धम्म देसना देउन तथागताच्या करुणामय धम्माच्या प्रचार प्रसाराचे आवाहन केले.

प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित असलेले डॉ. म.सु. पगारे यांनी तथागतांच्या अस्थिधातुंप्रति प्रचंड निष्ठा व्यक्त केली आणि सदर अस्थिधातूंचे दर्शन ही एक अविस्मरणीय बाब असल्याचे आपल्या मनोगतातून स्पष्ट केले.नागपूर येथील दीक्षाभूमी व दादर येथील चैत्यभूमीच्या ठिकाणी तथागत गौतम बुद्धांच्या अस्थि असणे गरजेचे आहे. त्याकरिता बौद्ध भिक्खू संघांनी भरीव प्रयत्न करावेत, अशी अपेक्षा संस्थेचे अध्यक्ष भरत शिरसाठ यांनी व्यक्त केली.

कार्यक्रमाच्या प्रारंभी तथागत गौतम बुद्ध, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर व माता रमाई यांना माल्यार्पण करण्यात आले. माता रमाई यांच्या स्मृती दिवस प्रित्यर्थ कुमारी प्रतीक्षाने आपले मनोगत व्यक्त केले. तथागत गौतम बुद्ध यांच्या अस्थिकलशाचे पूजन करण्यात आले. त्यानंतर त्रिशरण पंचशील सर्वांना देण्यात आले. कार्यक्रमाच्या शेवटी सर्व उपस्थित उपासक-उपासिकांना अस्थिधातूंचे दर्शन देण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भरत शिरसाट यांनी तर आभार डॉ. संदीप कोतकर यांनी मानले. कार्यक्रमास प्रा. नरेंद्र गायकवाड, प्रा. डॉ भूषण गवई, भैय्यासाहेब सोनवणे, प्रा. उमेश सूर्यवंशी, चिंतामण जाधव, उषाकिरण खैरनार, अण्णाभाऊ सोनवणे, बाबुराव भगत,प्रवीण केदार, मनोज नन्नवरे, सुभाष अमृतसागर,डॉ.अनिल चिकाटे, मुकेश ब्राह्मणे, रघुनाथ सपकाळे, भगवान ब्रम्हे, लखन बनसोडे, सुनील खैरनार, राहुल पवार, कुलदीप पवार, लक्ष्मण जाधव, बुद्धभूषण अहिरे, गौतम केदार, गौतम सोनवणे, निंबा खैरनार, रघुनाथ सपकाळे, वर्षा भरत शिरसाठ, सुलोचना खोब्रागडे, वर्षा संदीप कोतकर, निशांत खोब्रागडे, डॉ. वाकोडे, डॉक्टर शुभम जाधव, डॉक्टर भूषण जाधव, दीक्षा जाधव, मीना ब्रह्मे, सुरेखा सोनवणे, विमलबाई रामोशी, आशाताई पवार, मनीषा जाधव, जयश्री अमृतसागर, किरण नेतकर, राजू सोनवणे, शुभम तामस्वरे, पुंडलिक शिरसाट, प्रतीक्षा सोनवणे, गौतम सोनवणे, संगीता सुनील खैरनार, राजू बळीराम सोनवणे, भावरत्न शिरसाठ इत्यादींची उपस्थिती होती तसेच तालुक्यातील विविध खेडेगावांमधील मोठ्या प्रमाणावर धम्म उपासक- उपासिका कार्यक्रमास उपस्थित होते. ‘तथागत गौतम बुद्ध यांच्या अस्थी दर्शनाने जीवनाचे सार्थक झाले’ अशा प्रकारच्या प्रतिक्रिया उपस्थितांनी दिल्या.

Protected Content