Home Cities जळगाव १ डिसेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात लोकशाही दिनाचे आयोजन

१ डिसेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात लोकशाही दिनाचे आयोजन

0
188

जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगाव जिल्ह्यात शासनाच्या नागरिकाभिमुख कारभाराला वेग देण्यासाठी दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी घेण्यात येणारा जिल्हास्तरीय लोकशाही दिन हा महत्त्वाचा उपक्रम मानला जातो. नागरिकांच्या वैयक्तिक हितसंबंधांच्या तक्रारी थेट प्रशासनापुढे मांडण्याची संधी या दिवशी उपलब्ध होते. आगामी लोकशाही दिन १ डिसेंबर २०२५ रोजी आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाकडून जाहीर करण्यात आली आहे.

निवासी उपजिल्हाधिकारी विजयकुमार ढगे यांनी दिलेल्या माहितीनुसार, लोकशाही दिनाचे आयोजन सकाळी १०.३० वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील अल्पबचत सभागृहात करण्यात येणार आहे. जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत विविध प्रलंबित अर्ज, तक्रारी आणि मागण्यांवर सुनावणी होणार आहे. विशेषत: नागरिकांनी यापूर्वी तालुका लोकशाही दिनात अर्ज केलेला असून एका महिन्याच्या आत संबंधित कार्यालयाकडून कोणतेही उत्तर न मिळाल्यास अशाच प्रकारच्या प्रकरणांसाठी हा दिवस महत्त्वाचा ठरेल.

तक्रारदारांनी केवळ वैयक्तिक हितसंबंधाशी संबंधित तक्रारी घेऊन उपस्थित राहावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. प्रकरणासंबंधी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करूनच उपस्थित राहावे, ज्यामुळे संबंधित अर्जांची कार्यवाही तातडीने होण्यास मदत होईल, अशी माहितीही ढगे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली. लोकशाही दिनामुळे नागरिकांना त्यांच्या प्रश्नांचे उत्तर देणारे थेट व्यासपीठ उपलब्ध होत असून, अनेक तक्रारींचे निवारण याच माध्यमातून प्रभावीपणे केले जात असल्याचे प्रशासनाचे मत आहे.


Protected Content

Play sound