जळगाव प्रतिनिधी । माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाच्या वतीने प्रकाशित करण्यात आलेल्या लोकराज्य मासिकाच्या निवडणूक विशेषांकाचे प्रकाशन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांच्या हस्ते आज जिल्हाधिकारी कार्यालयात करण्यात आले. यावेळी अपर जिल्हाधिकारी तथा रावेर लोकसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी गोरक्ष गाडीलकर, जिल्हा माहिती अधिकारी विलास बोडके, माहिती अधिकारी जगन्नाथ पाटील आदी उपस्थित होते.
हा अंक निवडणूक प्रक्रियेची ओळख करून देण्याबरोबरच संदर्भासाठी उपयुक्त आहे, असे यावेळी डॉ. ढाकणे यांनी सांगितले. लोकराज्यला विशेषांकाची उत्तम परंपरा असल्याचेही ते म्हणाले. अपर मुख्य सचिव तथा मुख्य निवडणूक अधिकारी अश्वनी कुमार हे या अंकाचे अतिथी संपादक आहेत. मतदान करण्याविषयी जनजागृती करण्याबरोबरच निवडणूक प्रक्रियेशी संबंधित विविध गोष्टींची विस्तृत माहिती या अंकात देण्यात आली आहे. महिला व तृतीयपंथीय मतदारांचा वाढता सहभाग, मतदार जनजागृती, मतदान प्रक्रिया, निवडणूक अधिकारी-कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण, पेड न्यूज, समाज माध्यमांबाबत निवडणूक काळात घ्यावयाची खबरदारी, निवडणुकांचे बदलते तंत्र, निवडणुकीतील परिवर्तन युग, निवडणूक खर्चावर नियंत्रण आदींबाबत लेखांचा समावेश या अंकात करण्यात आला आहे. त्याचबरोबर राज्य निवडणूक आयोगाचे महत्वाचे अधिकारी, मतदार संघनिहाय निवडणूक निर्णय अधिकारी, पोलीस आयुक्त, जिल्हा पोलीस अधिक्षक यांचे महत्त्वाचे दूरध्वनी क्रमांक देण्यात आले आहेत. अभ्यासक, पत्रकारांना उपयुक्त ठरेल अशी सन 2009 व 2014 च्या निवडणूक निकालाच्या आकडेवारीचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये लोकसभा मतदार संघातील विधानसभा क्षेत्रे, एकूण मतदार नोंदणी, पुरुष व महिला मतदारांची संख्या, एकूण मतदार व एकूण झालेले मतदान, पहिल्या पाच उमेदवारांची नावे, त्यांचा पक्ष व त्यांना मिळालेल्या मतांची संख्या आदी माहितीचा यात समावेश करण्यात आला आहे.
आदर्श आचार संहितेबाबात नेहमी विचारल्या जाणाऱ्या महत्त्वपूर्ण प्रश्नांची उत्तरे या अंकात देण्यात आली आहेत. उमेदवार, कार्यकर्ते, अधिकारी-कर्मचारी व नागरिकांसाठी ही प्रश्नोत्तरे मार्गदर्शक ठरणारी आहेत. याची सविस्तर माहिती अंकात समाविष्ट करण्यात आली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रौढ मताधिकाराचे कट्टर समर्थक होते. त्यांनी केलेल्या मागणीनुसार भारतीय संविधानाने ‘एक व्यक्ती, एक मतदार आणि एक मूल्य’ हे तत्त्व स्वीकारून भारतीयांना प्रौढ मतदानाचा अधिकार मिळवून दिला. याबाबाच्या लेखाचाही अंकात समावेश करण्यात आला आहे.