Home Cities जळगाव वीजबिल डाऊनलोडसाठी आता ‘लॉगिन’ सक्तीचे

वीजबिल डाऊनलोडसाठी आता ‘लॉगिन’ सक्तीचे


जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । वीजबिल डाऊनलोड करण्याच्या प्रक्रियेत महत्त्वाचा बदल करत महावितरणने आपल्या ग्राहकांसाठी आता ‘लॉगिन’ अनिवार्य केलं आहे. ग्राहकांच्या सुरक्षिततेचा आणि वैयक्तिक माहितीच्या गोपनीयतेचा विचार करत महावितरणने हा निर्णय घेतला असून, यामागे केंद्र सरकारच्या सायबर सुरक्षेच्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करण्यात आले आहे.

महावितरणच्या अधिकृत संकेतस्थळ www.mahadiscom.in वरून ‘वीजदेयक अवलोकन/भरणा’ या पेजवरून लघुदाब वर्गवारीतील ग्राहक – म्हणजे घरगुती, व्यावसायिक, औद्योगिक तसेच इतर प्रकारच्या ग्राहकांना चालू महिन्याच्या वीजबिलाची पीडीएफ प्रत डाऊनलोड करण्याची सुविधा पूर्वीपासून उपलब्ध होती. मात्र यापूर्वी केवळ १२ अंकी ग्राहक क्रमांक टाकून कोणतेही लॉगिन न करता बिल मिळवता येत होते. आता ही प्रक्रिया थोडी अधिक सुरक्षित करण्यात आली असून, पीडीएफ प्रत मिळवण्यासाठी ‘नोंदणीकृत प्रवेश’ बंधनकारक करण्यात आला आहे.

नव्या प्रक्रियेअंतर्गत, वीज बिल ऑनलाइन भरता येण्याची सुविधा मात्र पूर्वीप्रमाणे खुलीच ठेवण्यात आली आहे. म्हणजेच लॉगिनशिवायही ग्राहक वीजबिल भरू शकतात. मात्र वीजबिलाची पीडीएफ प्रत पाहायची असल्यास ग्राहकांनी संकेतस्थळावर लॉगिन करणे आवश्यक आहे. या लॉगिनसाठीची लिंक ‘View/Pay Bill’ पेजवर स्पष्टपणे दिली असून, ग्राहकांनी आपला १२ अंकी ग्राहक क्रमांक, मोबाइल क्रमांक व ई-मेल आयडी (असल्यास) भरून नोंदणी करावी लागेल. यानंतर ते स्वतःसाठी एक लॉगिन आयडी आणि पासवर्ड तयार करू शकतात.

एकदा लॉगिन केल्यानंतर ग्राहकांना त्यांच्या एकाहून अधिक वीजजोडण्यांसाठी सुविधा मिळते. यामुळे प्रत्येकवेळी ग्राहक क्रमांक लक्षात ठेवण्याची गरज राहत नाही. याशिवाय, ग्राहक वीजबिलावरील नाव बदलणे, वीज भारात बदल करणे, तक्रार नोंदवणे व तक्रारीची सद्यस्थिती पाहणे, पत्ता बदलणे, वीजबिल भरणा अशा विविध ऑनलाइन सेवा एका लॉगिनमध्ये वापरू शकतात.

ग्राहकांनी सुरक्षेच्या दृष्टीने या बदलांची सकारात्मक दखल घेतली असून, अनेकांनी आधीच आपली नोंदणी पूर्ण केली आहे. डिजिटल व्यवहाराच्या वाढत्या वापरात ही प्रक्रिया अधिक सुरक्षित आणि सुलभ होण्यासाठी महत्त्वाची ठरणार आहे.


Protected Content

Play sound