मुंबई प्रतिनिधी | सोमवारी टास्क फोर्सच्या बैठकीत माहिती जाणून घेतल्यानंतर टप्प्याटप्प्याने राज्यात कमी संसर्ग असणार्या पूर्ण अनलॉकचा निर्णय होणार असल्याची माहिती आज मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी आज फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधतांना दिली. तर लसींचे दोन्ही डोस घेतलेल्यांसाठी १५ ऑगस्टपासून लोकल प्रवासाची परवानगी मिळणार असल्याची घोषणा देखील त्यांनी दिली.
मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी आज राज्यातील जनतेशी संवाद साधला. यात त्यांनी पहिल्यांदा ऑलींपीकमधील पदक विजेच्या खेळाडूंचे व त्यातही सुवर्णवेध करणार्या नीरज चोप्राचे विशेष कौतुक केले. नीरजने देशाची मान उंचावली असल्याचे त्यांनी नमूद केले. ते पुढे म्हणाले की, गेल्या स्वातंत्र्य दिनाला आपल्याला वाटत होते की, वर्षभरात कोविड जाईल. मात्र तसे झाले नाही. अनेक लाटा येत असून अजून किती येणार हे माहित नाही. मात्र आता कोविडची दहशती उलकोविडचा प्रतिकार करतांनाच आपल्याला नैसर्गिक आपत्तींना तोंड द्यावे लागत आहे. यात महापूर, दरड कोसळणे आदी घटनांनी आपली परीक्षा घेतली. मात्र आपण याचा चांगला प्रतिकार केल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. तर केंद्र सरकारने ओबीसी आरक्षणासाठी इंपेरिकल डाटा जमा करण्याची आणि मराठा आरक्षणासाठी ५० टक्क्यांची अट शिथील करण्याची मागणी देखील त्यांनी केली.
मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, कोरोनाचा विषाणू हा आपले स्वरूप बदलत असल्याची बाब अतिशय गंभीर आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये अजूनही रूग्णसंख्या वाढीस लागली आहे. तथापि, आता बहुतांश भागांमध्ये अनलॉक करावे अशी मागणी होत आहे. अलीकडेच हॉटेलचालकांची संघटनेने आपली भेट घेऊन हीच मागणी केली आहे. याबाबत उद्या टास्क फोर्सची बैठक घेऊन निर्णय घेतला जाईल. तर १५ ऑगस्टपासून दोन्ही डोस घेतलेल्यांना लोकल प्रवासाची परवानगी मिळणार असल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले.