पाचोरा प्रतिनिधी । लिव्हर ट्रान्सप्लांट हे कधी काळी खूप महागडे असले तरी आता ही उपचार पध्दती सर्वसामान्यांच्या अवाक्यात आली असून आपण उत्तर महाराष्ट्रात ही शस्त्रक्रिया उपलब्ध केली असल्याची माहिती डॉ. शरद देशमुख यांनी दिली. ते लाईव्ह ट्रेंडस न्यूजला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते.
ख्यातप्राप्त लिव्हर तज्ज्ञ डॉ. शरद देशमुख हे मूळचे पाचोरा तालुक्यातील रहिवासी असून ते सध्या नाशिक येथील अपोलो हॉस्पीटलमध्ये लिव्हर व पोटाच्या विकारांचे तज्ज्ञ म्हणून कार्यरत आहेत. महिन्याच्या प्रत्येक दुसर्या मंगळवारी ते पाचोरा येथील विघ्नहर्ता सुपर स्पेशालिटी हॉस्पीटलमध्ये आपली सेवा देत असतात. या अनुषंगाने लाईव्ह ट्रेंडस् न्यूजला दिलेल्या मुलाखतीत डॉ. देशमुख यांनी लिव्हर ट्रान्सप्लांटसह निरोगी यकृतासाठीबाबत माहिती दिली. ते म्हणाले की, लिव्हरचे कार्य उत्तम पध्दतीने होऊन पोट व लिव्हरचे आजार होऊ नये यासाठी जेवणात जास्त तिखट, मसाले आदींचा वापर नसावा. दोन वेळेस भरपेट जेवण करण्याऐवजी दिवसातून तीन वा चार वेळेस थोडे-थोडे खाणे उत्तम. पान-तंबाकू, धुम्रपान तसेच मद्यपान आदी व्यसनांपासून दूर राहण्याची आवश्यकताही त्यांनी अधोरेखीत केली. सर्वात महत्वाची बाब म्हणजे नियमितपणे पुरेशी अर्थात सहा ते आठ तासांची निद्रा खूप आवश्यक असल्याचे ते म्हणाले.
डॉ. शरद देशमुख पुढे म्हणाले की, बदलती जीवनशैली आणि वाढत्या व्यवसनांमुळे पोटांचे विकार व विशेष करून कर्करोगाचे प्रमाण खूप वाढले आहे. याचे निदान करण्यासाठी सोनोग्राफी, सीटी स्कॅन, एंडोस्कोपी, कोलोनोस्कोपी आदींसारख्या सुविधा विघ्नहर्ता सुपर स्पेशालिटी हॉस्पीटलमध्ये उपलब्ध आहेत. यांच्या मदतीने रोगांचे वेळीच निदान झाल्यास रूग्णावर यशस्वी उपचार होऊ शकतो. सध्या फास्टफुडचे प्रमाण वाढत असल्यामुळे अनेक विकारांना आमंत्रण मिळत आहे. यामुळे मुलांमध्ये स्थूलपणासह अनेक विकार बळावत आहेत. मधुमेहाचे प्रमाणदेखील यामुळे वाढीस लागले आहे. यामुळे फास्ट फुड आणि शीतपेयांचा वापर टाळल्यास उत्तम असा सल्ला डॉ. शरद देशमुख यांनी दिला.
याप्रसंगी डॉ. शरद देशमुख यांनी यकृत प्रत्यारोपण म्हणजे लिव्हर ट्रान्सप्लांटबाबत माहिती दिली. ते म्हणाले की, २०११ च्या सुमारास यकृत प्रत्यारोपणासाठी तब्बल ३० ते ३५ लाख रूपये लागत होते. मात्र आता याचे मूल्य बर्याच प्रमाणात कमी झालेले आहे. लक्षणीय बाब म्हणजे डॉ. शरद देशमुख यांनी अलीकडेच नाशिकमध्ये उत्तर महाराष्ट्रातील पहिले लिव्हर ट्रान्सप्लांट यशस्वी केले आहे. याच्या अंतर्गत दोन लिव्हर ट्रान्सप्लांट करण्यात आले. डॉ. देशमुख यांनी गत दोन वर्षात सुमारे ३० यकृत प्रत्यारोपण केलेले असून या रूग्णांना नवीन जीवन मिळाले आहे. अर्थात, ही आधुनीक उपचार पध्दती उपलब्ध असली तरी लिव्हरच्या व्याधी होऊच नये यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. स्थूलपणामुळे लिव्हरची व्याधी होती. म्हणून फॅटी लिव्हरचे निदान करणे गरजेचे आहे. याशिवाय, व्यसनांपासून दूर राहण्याचा सल्लादेखील त्यांनी दिला. याच्या जोडील हिपॅटायटीस बी आणि सी हेदेखील लिव्हरसाठी घातक आहेत. यामुळे याची वेळीच तपासणी करून घेण्याचेही डॉ. देशमुख यांनी सुचविले आहे. याशिवाय, हिपॅटायटीसची लस घेणे हेदेखील लिव्हरशी संबंधीत रोगांच्या प्रतिकारासाठी आवश्यक असल्याचे डॉ. देशमुख म्हणाले. तर लिव्हर फायब्रोस्कॅनसारख्या तपासण्यादेखील अतिशय उपयुक्त असून विघ्नहर्ता सुपर स्पेशालिटी हॉस्पीटलमध्ये ही चाचणी उपलब्ध असल्याची माहितीदेखील त्यांनी दिली.
पहा : लिव्हर ट्रान्सप्लांटबाबत डॉ. शरद देशमुख यांनी दिलेली माहिती.