Home Cities जळगाव लाईव्ह ट्रेंड्स न्यूजच्या पाठपुराव्याला यश ; नवी पेठेतील धोकादायक वाकलेला विद्युत खांब...

लाईव्ह ट्रेंड्स न्यूजच्या पाठपुराव्याला यश ; नवी पेठेतील धोकादायक वाकलेला विद्युत खांब अखेर हटवला


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । प्रभाग क्रमांक पाचमधील नवी पेठ भागात इच्छापूर्ती गणपती मंदिरासमोरील मुख्य रस्त्यावर उभा असलेला महावितरणचा वाकलेला विद्युत खांब नागरिकांसाठी मोठा धोका ठरत होता. या खांबामुळे गेल्या काही महिन्यांत अनेक अपघात घडले असून, चारचाकी वाहने पलटी होण्याच्या घटनांमध्ये अनेक नागरिक गंभीर जखमी झाले होते. अखेर लाईव्ह ट्रेंड्स न्यूजच्या सातत्यपूर्ण वृत्तांकन आणि पाठपुराव्यामुळे या गंभीर समस्येची दखल घेत महावितरणने हा खांब सुरक्षितरीत्या निष्कासित केला आहे.

या धोकादायक विद्युत खांबाबाबत लाईव्ह ट्रेंड्स न्यूजने काही दिवसांपूर्वी सविस्तर वृत्त प्रसिद्ध करून महावितरण प्रशासनासह लोकप्रतिनिधींचे लक्ष वेधले होते. अपघातांची वाढती संख्या आणि नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न अधोरेखित करत सातत्याने पाठपुरावा करण्यात आला होता. यानंतर महावितरण प्रशासनाने तत्काळ हालचाल करत स्थानिक लोकप्रतिनिधींशी चर्चा सुरू केली.

आमदार राजू मामा भोळे, प्रभागातील नगरसेवक विष्णू भंगाळे, नितीन लड्डा, श्याम कोकटा आणि अनिल पगारिया यांच्याशी सविस्तर चर्चा करून या विद्युत खांबाबाबत योग्य निर्णय घेण्यात आला. अखेर आज हा वाकलेला विद्युत खांब पूर्णपणे आणि सुरक्षित पद्धतीने हटवण्यात आला. त्यामुळे नवी पेठ भागातील मुख्य रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांना आणि पादचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

स्थानिक नागरिकांनी या कारवाईबद्दल समाधान व्यक्त करत महावितरण प्रशासन, लोकप्रतिनिधी आणि लाईव्ह ट्रेंड्स न्यूजच्या भूमिकेचे कौतुक केले आहे. भविष्यात अशा धोकादायक ठिकाणांची वेळेत दखल घेऊन अपघात टाळण्यासाठी तत्काळ उपाययोजना करण्यात याव्यात, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

एकूणच, माध्यमांच्या प्रभावी पाठपुराव्यामुळे आणि प्रशासनाच्या सकारात्मक प्रतिसादामुळे नवी पेठेतील दीर्घकाळापासून प्रलंबित असलेली समस्या मार्गी लागली असून, नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी हा महत्त्वाचा आणि दिलासादायक निर्णय ठरला आहे.


Protected Content

Play sound