Home राजकीय झेडपी निवडणूकीसाठी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर

झेडपी निवडणूकीसाठी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर


मुंबई-वृत्तसेवा । राज्यात नुकत्याच पार पडलेल्या महापालिका निवडणुकांमध्ये अनेक ठिकाणी उल्लेखनीय यश मिळवल्यानंतर काँग्रेस पक्षाने आता जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांकडे लक्ष केंद्रित केले आहे. लातूर महापालिकेत सत्ता मिळवल्यानंतर पक्षाच्या गोटात उत्साहाचे वातावरण असून ग्रामीण पातळीवरही बळकटी देण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने जोरदार तयारी सुरू केली आहे.

राज्यातील १२ जिल्हा परिषद व १२५ पंचायत समिती निवडणुकांसाठी काँग्रेसकडून ४० स्टार प्रचारकांची यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीत महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला, प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, विधिमंडळ पक्षनेते आमदार विजय वडेट्टीवार, खासदार छत्रपती शाहू महाराज, विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज ऊर्फ बंटी पाटील, एआयसीसीचे सरचिटणीस खासदार मुकुल वासनिक, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, काँग्रेस कार्य समिती सदस्य बाळासाहेब थोरात, खासदार रजनी पाटील, गोवा प्रभारी माणिकराव ठाकरे, माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा समावेश आहे.

तसेच अल्पसंख्याक विभागाचे राष्ट्रीय अध्यक्ष व राज्यसभा खासदार इम्रान प्रतापगढी, राज्यसभा खासदार चंद्रकांत हंडोरे, नसीम खान, यशोमती ठाकूर, खासदार प्रणिती शिंदे, आमदार अमिन पटेल, माजी मंत्री डॉ. नितीन राऊत, आमदार अमित देशमुख, डॉ. विश्वजित कदम, अनिस अहमद, रमेश बागवे, हुसेन दलवाई, साजिद खान पठाण, वसंत पुरके, धिरज देशमुख, रामहरी रुपनवर, एम. एम. शेख, वजाहत मिर्झा, अतुल लोंढे, सिद्धार्थ हत्तीअंबिरे, यशपाल भिंगे, मुफ्ती हारुन नदवी, शाह आलम शेख, संध्या सव्वालाखे, शिवराज मोरे, विलास औताडे, सागर साळुंखे, अक्षय राऊत आणि हनुमंत पवार यांचाही प्रचारकांमध्ये समावेश करण्यात आला आहे.

महापालिका निवडणुकांतील कामगिरीच्या बळावर ग्रामीण भागात संघटन अधिक मजबूत करण्याची रणनीती काँग्रेसने आखली आहे. स्थानिक प्रश्न, शेतकरी व युवकांशी निगडित मुद्द्यांवर प्रचार केंद्रित केला जाणार असल्याची माहिती पक्ष सूत्रांनी दिली.

दरम्यान, चंद्रपूर जिल्ह्यात काँग्रेसमध्ये कोणताही अंतर्गत वाद नसल्याचे स्पष्ट करत प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी पक्षातील ऐक्यावर भर दिला. विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार आणि खासदार प्रतिभा धानोरकर यांच्यात योग्य समन्वय असून त्यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यात पक्षाला चांगले यश मिळाल्याचे त्यांनी सांगितले. या दोन्ही नेत्यांमध्ये संवादात कोणतीही अडचण नसून पुढेही तसेच राहील, असा विश्वास सपकाळ यांनी व्यक्त केला.


Protected Content

Play sound