रावेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जागतिक आदिवासी दिनाचे औचित्य साधत रावेर शहरातील मेट्रो हॉस्पिटलने एका सहा वर्षीय आदिवासी मुलीला जीवनदान दिले आहे. गंभीर अवस्थेत दाखल झालेल्या विद्या बारेला या चिमुकलीला बालरोगतज्ज्ञ डॉ. साजिद खान यांनी वेळेत उपचार दिल्याने ती शुद्धीवर आली. या सुखद घटनेने मुलीच्या पालकांसह उपस्थित सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद फुलला.

आज जागतिक आदिवासी दिनानिमित्त रावेर तालुक्यातील शेरी नाका बोर्डर परिसरात मजुरी करणाऱ्या यरशिंग बारेला आणि चंदा बारेला यांच्या सहा वर्षीय मुलीला, विद्याला, सकाळी अचानक तीव्र ताप आला आणि ती बेशुद्ध झाली. घाबरलेल्या पालकांनी तिला तात्काळ पाल येथील ग्रामीण रुग्णालयात नेले. तेथे प्राथमिक उपचारानंतरही तिची प्रकृती गंभीर असल्याने तिला रावेर येथील मेट्रो हॉस्पिटलमध्ये आणण्यात आले.

मेट्रो हॉस्पिटलमध्ये बालरोगतज्ज्ञ डॉ. साजिद खान यांनी बेशुद्धावस्थेत असलेल्या विद्यावर तात्काळ उपचार सुरू केले. तपासणीअंती तिला फिट आणि मेंदूज्वराचा त्रास असल्याचे निदान झाले. जवळपास दोन तासांच्या अथक प्रयत्नांनंतर विद्या शुद्धीवर आली आणि तिच्या पालकांनी सुटकेचा निश्वास टाकला.
याविषयी बोलताना डॉ. खान म्हणाले, “आता ती सुरक्षित आहे.” विशेष म्हणजे, जागतिक आदिवासी दिनाचे औचित्य साधून या गरीब आदिवासी मुलीवर मोफत औषधोपचार करण्यात येणार असल्याची माहिती मेट्रो हॉस्पिटलचे संचालक डॉ. शब्बीर खान यांनी दिली. वेळेत मिळालेल्या उपचारामुळे आणि हॉस्पिटलने दाखवलेल्या माणुसकीमुळे विद्याला नवीन आयुष्य मिळाले आहे.



