Home प्रशासन तहसील मुक्ताईनगरात जीवघेणा ‘खड्डा’!; तातडीने काम न झाल्यास तीव्र आंदोलन

मुक्ताईनगरात जीवघेणा ‘खड्डा’!; तातडीने काम न झाल्यास तीव्र आंदोलन

0
177

मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । मुक्ताईनगर शहरातील भुसावळ रोडवरील हॉटेल मुक्ताई पॅलेससमोर पडलेला एक मोठा आणि धोकादायक खड्डा सध्या परिसरातील नागरिकांसाठी आणि वाहनधारकांसाठी मोठा धोका निर्माण करत आहे. या गंभीर प्रश्नाकडे संबंधित विभागाचे पूर्णपणे दुर्लक्ष होत असल्याने स्थानिक नागरिक, व्यावसायिक आणि खेळाडूंमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.

पावसाळ्यात त्यात पाणी साचल्यावर त्याचा अंदाज येत नाही आणि तो पूर्णपणे दिसेनासा होतो. त्यामुळे दुचाकीस्वार, चारचाकी वाहने आणि पादचारी यांना रोजच लहान-मोठे अपघात आणि शारीरिक इजांना सामोरे जावे लागत आहे. पाऊस नसतानाही या खड्ड्यातून प्रवास करणे अत्यंत जिकिरीचे ठरत आहे.

या समस्येकडे दुर्लक्ष होत असल्याने स्थानिक नागरिक आणि व्यावसायिक संतप्त झाले आहेत. “एखादा मोठा अपघात होऊन जीविताची हानी झाल्यानंतरच प्रशासनाला जाग येणार आहे का? की त्याआधीच उपाययोजना करून नागरिकांचा जीव वाचवला जाईल?” असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित होत आहे. नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण करणारा हा प्रश्न तातडीने सोडवण्याची मागणी सर्व स्तरांतून जोर धरू लागली आहे.

व्यावसायिकांसह खेळाडूंचा आंदोलनाचा इशारा
या रस्त्याच्या दुर्दशेमुळे परिसरातील अनेक व्यावसायिक आणि संस्था त्रस्त झाल्या आहेत. हॉटेल मुक्ताई पॅलेस, तळेकर फिटनेस, ओम साई कार बाजार, हॉटेल महेंद्रा, हॉटेल दोस्ती, पाटील हार्डवेअर, हॉटेल नक्षत्र, हॉटेल गीतांजली या हॉटेल आणि दुकानांचे संचालक, तसेच पशुवैद्यकीय दवाखान्यातील सर्व कर्मचाऱ्यांनी या खड्ड्याच्या विरोधात आंदोलनाचा इशारा दिला आहे.

या मागणीला तालुक्यातील क्रीडा संकुलातील रोज सराव करणारे सर्व खेळाडूंचेही मोठे समर्थन मिळाले आहे. रस्ता खराब असल्याने खेळाडूंनाही धोकादायक मार्गावरून ये-जा करावी लागत आहे. नागरिकांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला स्पष्ट इशारा दिला आहे की, हा जीवघेणा खड्डा तातडीने बुजविण्यात आला नाही, तर परिसरात तीव्र व व्यापक आंदोलन छेडले जाईल. नागरिकांची सुरक्षा आणि रस्त्याची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी जोर धरत आहे.


Protected Content

Play sound