यावल प्रतिनिधी । तालुक्यातील साकळी परिसरातुन जाणाऱ्या हतनूर कालव्यामधून नावरे येथील बंधाऱ्यात पाणी सोडण्यात यावे, अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष तथा साकळी पीक संरक्षक संस्थेचे चेअरमन दिपक पाटील यांनी राज्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटील यांना पत्राव्दारे केली आहे.
जर हा शेतकरी हिताचा प्रकल्प झाला तर परिसरातील शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे. पत्रात नमूद केल्यानुसार, नावरे तालुका यावल जिल्हा जळगाव गावाजवळ १९६२ मध्ये दुष्काळी परिस्थिती मध्ये लोक सहभागातून भोनक नदीवर एका बंधाऱ्याचे बांधकाम केलेले होते. तो बंधारा आजही सुस्थितीत आहे. परंतु भोनक नदीवर सातपुडा पर्वतामध्ये झालेल्या धरणामुळे या बंधाऱ्यातमध्ये मागील आठ ते दहा वर्षापासून पाण्याची आवक नसल्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे.
तथापि या बंधाऱ्यापासून २ किमी अंतरावर हतनूर कालवा आहे.या कालव्यामध्ये नेहमी पाणी उपलब्ध असते तरी या हतनूर कालव्यातून नवीन पाईपलाईन करून जर पाणी नावरे बंधाऱ्यात सोडले तर परिसरातील शेतकऱ्यांना खूप फायदा होईल.तरी आपल्या स्तरावरून सदर कामास मंजुर करावे अशी मागणी दिपक पाटील यांनी केलेली आहे.
सदरील पत्र दीपक पाटील यांनी दि २३ रोजी मुंबई येथे जलसंपदा मंत्री ना. जयंत पाटील यांना दिलेले आहे. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष रवींद्र भैय्या पाटील तसेच जिल्हा बॅंकेच्या चेअरमन सौ.रोहिणीताई खडसे- खेवलकर यांच्यासोबत दीपक पाटील यांनी मंत्री महोदयांची भेट घेतली.
हातनुर कालव्यातून पाणी उचलून ते थेट नावरे येथील बंधारा टाकणे हा परिसरासाठी एक नवीन,मोठा व परिसराच्या जिव्हाळ्याचा प्रकल्प असणार आहे.भविष्यात जर हा प्रकल्प साकारला गेला तर साकळी सह परिसरातील पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सुटण्यासाठी मोठी मदत होणार आहे.
सदर कामासाठी जलसंपदामत्री ना.पाटील यांनी सकारात्मकता दाखवली आहे. तसेच सदरील पत्र ना.पाटील यांनी तात्काळ कारवाईसाठी जलसंपदा विभागाकडे दिलेले आहे, असे राष्ट्रवादीचे दिपक पाटील यांनी ‘लाईव्ह टेंड्र न्युज’शी बोलतांना सांगितले आहे.