सकारात्मक शिस्तीतून घडवूया विद्यार्थ्यांचे जीवन : शंकर भामेरे


पहूर–लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सकारात्मक शिस्त ही काळाची गरज असून, विद्यार्थ्यांकडे आईच्या मायेने पाहून त्यांना समजून घेतले तरच त्यांचे जीवन योग्य दिशेने घडविता येईल, असे प्रतिपादन बालरक्षक चळवळीचे कार्यकर्ते व सावित्रीबाई फुले विद्यालयाचे शिक्षक शंकर भामेरे यांनी केले. ते पहूर येथे आयोजित पाचव्या केंद्रस्तरीय शिक्षण परिषदेत ‘सकारात्मक शिस्त’ या विषयावर मार्गदर्शन करताना बोलत होते.

राज्य शासनाच्या शालेय शिक्षण विभागाच्या परिपत्रकानुसार जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, जळगाव यांच्या मार्गदर्शनाखाली या शिक्षण परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. संतोषी माता नगर प्राथमिक शाळा तसेच सांगवी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या सहकार्याने परिषद यशस्वीरीत्या पार पडली. परिषदेस केंद्रप्रमुख भानुदास पाटील अध्यक्षस्थानी होते. प्रारंभी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून दीपप्रज्वलन करण्यात आले, त्यानंतर विद्यार्थ्यांनी ईशस्तवन व स्वागतगीत सादर करून वातावरण भारावून टाकले.

कार्यक्रमात पंचायत समिती शिक्षण विभागाचे विषयतज्ज्ञ महेंद्र नाईक यांनी यू-डायस संदर्भात सविस्तर मार्गदर्शन केले. दिलीप हुसे यांनी पर्यावरण शिक्षण व आपत्ती व्यवस्थापन या विषयावर, तर मनिषा राऊत यांनी ‘माझा वर्ग – माझे नियोजन’ या विषयावर प्रभावी तासिका सादर केल्या. यावेळी पंकज रानोटकर, मुख्याध्यापिका चित्रलेखा राजपूत, तसेच भानुदास पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

परिषदेदरम्यान गुणवंत विद्यार्थी व शिक्षकांचा सन्मान सोहळाही आयोजित करण्यात आला. राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, पुणे यांच्या वतीने आयोजित शिक्षक व अधिकारी गोळाफेक स्पर्धेत विभागीय पातळीवर उत्कृष्ट कामगिरी करत राज्यस्तरावर निवड झाल्याबद्दल पहूर पेठ कन्या शाळेच्या शिक्षिका जयश्री पाटील यांचा स्नेहवस्त्र व गुलाबपुष्प देऊन गौरव करण्यात आला.

सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालयाची तायक्वांदो खेळाडू मोहिनी हरिभाऊ राऊत हिने राज्यस्तरीय ओपन तायक्वांदो स्पर्धेत रौप्यपदक पटकावून राष्ट्रीय तायक्वांदो फेडरेशन कप व राष्ट्रीय ‘चॅम्पियन ऑफ चॅम्पियन’ तायक्वांदो कप स्पर्धेसाठी निवड मिळविल्याबद्दल तिचा सन्मान करण्यात आला. तसेच आर. टी. लेले हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचा विद्यार्थी केतन सुरेश गायकवाड याने जिल्हास्तरीय सुंदर हस्ताक्षर स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकाविल्याबद्दल त्याचाही गौरव करण्यात आला.

शिवनगर जिल्हा परिषद शाळेत वीज व्यवस्था उपलब्ध करून शाळेला डिजिटल स्वरूप देण्यात मोलाचे योगदान दिल्याबद्दल चंद्रकांत सोनाळकर व भानुदास पाटील यांनाही यावेळी सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमास पहूर केंद्रातील मुख्याध्यापक व शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन उमेश पाटील यांनी केले, तर प्रास्ताविक निलेश ताडे यांनी मांडले. परिषद यशस्वी करण्यासाठी निकिता तगरे, उमाकांत तळेले, हितेंद्र जाधव, गोपाल सपकाळ, प्रकाश घोंगडे यांच्यासह सर्व शिक्षकांनी परिश्रम घेतले.