जळगाव : लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । मानवी जीवन अधिक अर्थपूर्ण आणि मूल्याधिष्ठित करण्यासाठी महात्मा गांधी आणि इतर अनेक महापुरुषांनी दाखवलेला सामाजिक परिवर्तनाचा मार्ग आजच्या तरुणांनी समृद्ध करणे हीच खरी त्यांच्यावरील कृतज्ञता आहे, असे मत पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर विद्यापीठाच्या माजी कुलगुरू व खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटीच्या शिक्षण संचालिका डॉ. मृणालिनी फडणवीस यांनी व्यक्त केले. त्या गांधी रिसर्च फाऊंडेशन आयोजित ‘नॅशनल गांधीयन लीडरशिप कॅम्प’च्या उद्घाटनप्रसंगी वाकोद येथील गौराई कृषी फार्म येथे बोलत होत्या.
या प्रसंगी व्यासपीठावर गांधी रिसर्च फाऊंडेशनचे विश्वस्त डॉ. सुदर्शन अयंगार, रिसर्च डीन डॉ. गीता धर्मपाल, ज्येष्ठ गांधीयन अब्दुलभाई, व्यवस्थापक विनोदसिंह राजपूत, प्राचार्य देवेंद्र चौधरी, समन्वयक उदय महाजन, तसेच अकॅडेमिक डीन डॉ. अश्विन झाला उपस्थित होते.

डॉ. फडणवीस म्हणाल्या, “आजच्या काळात प्रश्न विचारण्याची आणि चिंतन करण्याची सवय प्रत्येक तरुणाने ठेवली पाहिजे. तंत्रज्ञान स्वीकारताना संयम, श्रद्धा आणि नियंत्रण या मूल्यांची जोड आवश्यक आहे. गांधीजींच्या जीवनातून आपण संयम, आत्मशिस्त आणि सामाजिक उत्तरदायित्व शिकू शकतो.” त्यांनी पुढे सांगितले की, “शाश्वत विकासाचा विचार करताना समाजासाठी हितकारक गोष्टी आत्मसात करून प्लास्टिकचा वापर कमी करणे, श्रमाची प्रतिष्ठा जोपासणे, या माध्यमातून आदर्श व्यक्तिमत्वांची निर्मिती होईल.”
कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्ज्वलन करण्यात आले. त्यानंतर विविध राज्यांमधून आलेल्या विद्यार्थ्यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. पदव्युत्तर अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांनी ‘साबरमती के संत तूने कर दिया कमाल’ हे गीत सादर करून वातावरण भारावून टाकले.
डॉ. गीता धर्मपाल यांनी प्रास्ताविकातून शिबिरामागील उद्दिष्ट स्पष्ट केले. अब्दुलभाई यांनी विद्यार्थ्यांना शिबिरातील शिस्त, सहभाग आणि जबाबदारी याविषयी मार्गदर्शन केले.
अध्यक्षीय समारोपात डॉ. सुदर्शन अयंगार यांनी ग्रामीण पार्श्वभूमीत हे शिबिर आयोजित करण्यामागील भूमिका स्पष्ट केली. त्यांनी सांगितले, “या शिबिराचा उद्देश म्हणजे युवा पिढीने ‘युवा गांधी’ला समजून घेणे. गांधीजींनी जसा समाजपरिवर्तनाचा मार्ग दाखविला आणि स्वातंत्र्य चळवळीत देशाला एकत्र बांधले, तसा आत्मसात करण्याचा प्रयत्न या शिबिराद्वारे होईल.”
डॉ. अश्विन झाला यांनी प्रास्ताविक केले, तर दीपक मिश्रा यांनी आभार मानले.
या शिबिरात १६ राज्यांतील ५४ युवक-युवती सहभागी झाले आहेत. उपस्थित मान्यवर आणि शिबिरार्थींच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. ९ नोव्हेंबरपर्यंत चालणाऱ्या या शिबिरात विविध सत्रांसह श्रमदान, जनजागृती आणि सामाजिक उपक्रम राबवले जाणार आहेत. तसेच शिबिरार्थींना अजिंठा लेणी आणि जैन इरिगेशनच्या सामाजिक प्रकल्पांना भेट देण्याची संधी मिळणार आहे.



