मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील घोडसगाव आणि चिखली परिसरात गेल्या काही दिवसांपासून बिबट्याचा वावर वाढल्याने नागरिकांमध्ये प्रचंड घबराट पसरली आहे. गेल्या महिनाभरात बिबट्याने तब्बल चार वेळा हल्ले चढवले असून, यामध्ये दोन गाई, चार ते पाच मेंढ्या आणि काही माकडांची शिकार झाली आहे. या वाढत्या घटनांमुळे शेतकरी आणि पशुपालक मोठ्या चिंतेत सापडले आहेत.
बिबट्याच्या दहशतीमुळे शेतकरी शेतात जाण्यास घाबरत असून, जनावरे चराईसाठी नेणेही कठीण झाले आहे. सायंकाळनंतर नागरिक घराबाहेर पडण्याचे धाडस करत नसल्याने परिसरात अघोषित संचारबंदीसारखी स्थिती निर्माण झाली आहे. शिवारात बिबट्याचे ठसे वारंवार आढळून येत असल्याने या भागात बिबट्याचा वावर निश्चित असल्याचे बोलले जात आहे.

या पार्श्वभूमीवर संतप्त ग्रामस्थांनी वन विभागाकडे तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे. वन विभागाने या भागात पिंजरा लावून बिबट्याला लवकरात लवकर जेरबंद करावे आणि त्याला सुरक्षित नैसर्गिक अधिवासात सोडावे, अशी विनंती करण्यात आली आहे. तसेच ज्या शेतकऱ्यांचे पशुधन बिबट्याच्या हल्ल्यात दगावले आहे, त्यांना प्रशासनाने तातडीने आर्थिक भरपाई द्यावी, अशी मागणी जोर धरत आहे.
दुसरीकडे, वन विभागाने परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन परिसरात पाहणी सुरू केली आहे. वन अधिकाऱ्यांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले असून, अफवांवर विश्वास न ठेवता आपली जनावरे सुरक्षित ठिकाणी बांधण्याचे निर्देश दिले आहेत.



