यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | यावल तालुक्यातील साकळी शिवारात चार दिवसांपूर्वी सात वर्षीय आदिवासी बालकावर बिबट्याने हल्ला करून त्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. या पार्श्वभूमीवर वनविभागाच्या वतीने नागरिकांसाठी विविध खबरदारीच्या उपाययोजना सुचवण्यात आल्या आहेत.
पश्चिम वनक्षेत्राचे वनपरिक्षेत्र अधिकारी सुनील भिलावे यांनी सांगितले की, बिबट मानव संघर्ष टाळण्यासाठी नागरिकांनी सतर्क राहणे अत्यंत आवश्यक आहे. नागरिकांनी कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच रात्रीच्या वेळी शेतशिवारात, जंगलात किंवा बिबट्या वावरणाऱ्या भागात एकटे जाणे टाळावे.
शेतात काम करताना गटागटाने राहावे आणि सतत आवाज करावा. मोबाईलवर गाणी वाजवावी, लहान मुलांना एकटे सोडू नये.अचानक बिबट्या समोर आल्यास घाबरून न जाता त्याच्याकडे पाठ न फिरवता सावकाश त्या ठिकाणाहून दूर जावे. बिबट्याचा पाठलाग करू नये किंवा त्याला चिथावणी देऊ नये.बिबट्या विहिरीत पडल्यास, घरात शिरल्यास किंवा जखमी अवस्थेत आढळल्यास तात्काळ वनविभागाशी संपर्क साधावा. पाळीव प्राण्यांना सुरक्षित गोठ्यात ठेवावे जेणेकरून बिबट्याच्या हल्ल्यापासून त्यांचे संरक्षण होईल. वनविभागाच्या या सुचनांचे पालन करणे अत्यंत आवश्यक असून नागरिकांनी काळजी घेतल्यास संभाव्य धोका टाळता येऊ शकतो, असेही वनपरिक्षेत्र अधिकारी सुनील भिलावे यांनी नमूद केले.