सावदा, ता रावेर- लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । रावेर तालुक्यातील मौजे सुदगाव शिवारात तापी नदीच्या काठालगत असलेल्या शेतात एका बिबट्याचा जाळ्यात अडकून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना उघडकीस आली असून घटनेची माहिती मिळताच वन विभागाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली.
सहाय्यक वनसंरक्षक यावल समाधान पाटील वनपरिक्षेत्र अधिकारी रावेर श्रीकांत काळे, मानद वन्यजीव रक्षक जळगाव रविंद्र फालक पशुधन विकास अधिकारी डॉ रणजीत पाटील डॉ स्नेहल मोटेगावकर डॉ प्रदीप काळे डॉ राधा रासवे तसेच वन्यजीव अभ्यासकअमन गुजर व वन कर्मचारी यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. त्यावेळी संबंधित बिबट मृत अवस्थेत असल्याचे पशुधन विकास अधिकाऱ्यांनी घोषित केले.

यानंतर अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत शवविच्छेदन प्रक्रिया पार पाडण्यात आली पुढील वैद्यकीय तपासणीसाठी मृत बिबटाचे व्हिसेरा नमुने गोळा करून ते सिलबंद करण्यात आले आहेत. प्राथमिक शवविच्छेदन अहवालानुसार सदर बिबट्याचा मृत्यू डीहायड्रेशन (निर्जलीकरण) तसेच हिट स्ट्रोकमुळे झाल्याचे प्रथमदर्शनी आढळून आल्याची माहिती पशुधन विकास अधिकाऱ्यांनी दिली.
दरम्यान या घटनेप्रकरणी वनरक्षक लोहारा यांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध वनगुन्हा नोंदविला असून पुढील तपास सुरू आहे वन विभागाने नागरिकांना आवाहन केले आहे की वन्यप्राण्यांपासून संरक्षणासाठी बेकायदेशीर जाळे अथवा सापळे न लावता तत्काळ वन विभागाशी संपर्क साधावा. ही घटना वन्यजीव संरक्षणाबाबत जागरूकतेची गरज अधोरेखित करणारी असून पर्यावरण संतुलन राखण्यासाठी सर्वांनी संवेदनशीलतेने व कायद्याचे पालन करून सहकार्य करावे असे आवाहन वन विभागाकडून करण्यात आले आहे.



