नागपूरातील दाट वस्तीत बिबट्याचा धुमाकूळ; हल्ल्यात चार जण जखमी !


नागपूर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा । नागपूर शहरातील पारडी शिवारा अंतर्गत येणाऱ्या शिवनगर या दाट लोकवस्तीच्या भागात आज पहाटे बिबट्याने पुन्हा एकदा धुमाकूळ घातल्याने मोठी खळबळ उडाली आहे. दोन दिवसांपूर्वी कापसी परिसरात दिसलेला बिबट्याच आज सकाळी नागरिकांवर हल्ला करून एका घरात लपून बसल्याची माहिती आहे. पहाटेच्या वेळी झालेल्या या हल्ल्यात चार जण जखमी झाले असून, त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळी साडेपाच ते सहा वाजण्याच्या दरम्यान बिबट्याने शिवनगर परिसरामध्ये अचानक शिरकाव केला. या अनपेक्षित हल्ल्यात चार नागरिक जखमी झाले. स्थानिकांनी त्वरित पोलिसांना व वन विभागाला याची माहिती दिली. सध्या हा बिबट्या शिवनगरमधील एका वर्मा कुटुंबीयाच्या पांढऱ्या रंगाच्या घरात लपून बसला असल्याची प्राथमिक माहिती आहे.

घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन परिसरात तातडीने पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. मात्र, नागरिकांनी बिबट्याला पाहण्यासाठी मोठी गर्दी केल्यामुळे तसेच सतत आवाज केल्यामुळे बिबट्याला पकडण्याच्या कामात अडथळे येत आहेत. बिबट्याने हल्ला केल्यानंतर तातडीने मदत न मिळाल्याने स्थानिकांनी वन विभागाच्या रेस्क्यू टीमच्या दिरंगाईबद्दल तीव्र संताप व्यक्त केला आहे. घटनेची माहिती मिळूनही बचाव पथक उशिरा घटनास्थळी पोहोचल्याने परिसरातील नागरिकांमध्ये तणावाचे वातावरण आहे.

दरम्यान, वन विभागाचे प्रशिक्षित रेस्क्यू पथक आणि वैद्यकीय तज्ज्ञ घटनास्थळी पोहोचले असून, बिबट्याला ट्रँक्विलाईज (Tranquilize) करून बेशुद्ध करण्याची तयारी सुरू केली आहे. यासाठी आवश्यक असलेली डार्ट गन आणि औषधे सज्ज ठेवण्यात आली आहेत. बिबट्या लपून बसलेल्या वर्मा यांच्या घराच्या मुख्य दरवाजातून बिबट्या बाहेर पळून जाऊ नये यासाठी वन विभागाचे पथक त्या दरवाजाला तात्पुरती जाळी बसवण्याचे काम युद्धपातळीवर करत आहे.