
मुंबई-वृत्तसेवा | मार्चच्या सुरुवातीलाच वाढलेल्या उष्णतेमुळे बाजारात लिंबूच्या दरांनी पुन्हा एकदा उंच झेप घेतली आहे. थंड पेये, लिंबू सरबत, उसाचा रस आणि इतर शीतपेयांची मागणी वाढल्याने लिंबूचे दर झपाट्याने वाढत आहेत. सध्या किरकोळ बाजारात लिंबू १२० रुपये किलो दराने विकले जात असून घाऊक बाजारात सुमारे १०० रुपये किलो दर मिळत आहे. येत्या काही दिवसांत हा दर १५० रुपये किलोपर्यंत जाण्याची शक्यता विक्रेत्यांनी व्यक्त केली आहे.

जानेवारी महिन्याच्या अखेरपर्यंत लिंबूचे दर तुलनेने स्थिर होते. त्या काळात ऑफ सिझनमुळे लिंबू ४० ते ५० रुपये किलो दराने उपलब्ध होते. मात्र फेब्रुवारीपासून तापमानात वाढ होऊ लागल्याने लिंबूची मागणी अचानक वाढली आणि त्याचा थेट परिणाम दरांवर झाला. सध्या किरकोळ बाजारात एका लिंबासाठी ग्राहकांना ५ ते १० रुपये मोजावे लागत आहेत.
बाजारात उपलब्ध असलेल्या लिंबाच्या आकारानुसार एका किलोमध्ये साधारणपणे २० ते २५ लिंबू बसतात. उन्हाळ्याची चाहूल लागताच लिंबू सरबत विक्रेते, रसवंतीगृह, उसाच्या रसाच्या गाड्या तसेच कोल्ड्रिंक्स विक्रेत्यांकडून मोठ्या प्रमाणात मागणी वाढत आहे. त्यामुळे बाजारात आवक असूनही दर स्थिर राहत नसल्याचे चित्र दिसत आहे.
विक्रेते शिवराम तोडकर यांच्या मते, आगामी काही आठवड्यांत उष्णतेची तीव्रता आणखी वाढल्यास लिंबूच्या दरात अधिक वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच लिंबूचे दर चढे राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, राज्यासह पुणे जिल्ह्यात मार्चच्या सुरुवातीलाच तापमानात लक्षणीय वाढ झाली आहे. साधारणपणे एप्रिल–मे महिन्यात जाणवणारी उष्णता यंदा मार्चमध्येच जाणवू लागल्याने नागरिकांना उन्हाचा तीव्र चटका बसत आहे. वाढत्या तापमानाचा परिणाम शेतीवरही दिसून येत असून गहू, हरभरा, कांदा आणि भाजीपाला यांसारख्या रब्बी पिकांवर ताण निर्माण होत आहे.
अचानक वाढलेल्या तापमानामुळे पिकांची वाढ खुंटणे, दाणे भरण्याची प्रक्रिया अपूर्ण राहणे आणि त्यामुळे उत्पादन घटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. उष्णतेमुळे जमिनीतील आर्द्रता झपाट्याने कमी होत असल्याने शेतकऱ्यांना पिकांना अतिरिक्त पाणी द्यावे लागत आहे. परिणामी वीज वापर आणि शेतीचा खर्चही वाढत असल्याचे चित्र आहे.
उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच लिंबू महागल्याने सर्वसामान्य नागरिकांच्या खिशावर ताण पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.



