जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या निर्देशानुसार आणि प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, जळगाव यांच्या आदेशान्वये, जळगाव जिल्ह्यातील सैनिक आणि त्यांच्या कुटुंबियांना कायदेशीर मदत मिळवून देण्यासाठी एक महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आले आहे. गुरुवार, ७ ऑगस्ट रोजी सकाळी ११:४५ वाजता जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, जळगाव येथे ‘वीर परिवार सहायता योजना २०२५’ अंतर्गत विधी सेवा चिकित्सालयाचे उद्घाटन करण्यात आले.
या विधी सेवा चिकित्सालयाच्या उद्घाटन समारंभात जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव पवन बनसोड यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम पार पडला. यावेळी बोलताना श्री. बनसोड यांनी सांगितले की, राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणाच्या पुढाकाराने देशभरात सुरू करण्यात आलेल्या या उपक्रमामुळे सैनिक आणि त्यांच्या कुटुंबियांना कायदेशीर अडचणी सोडवण्यासाठी एक हक्काचे व्यासपीठ उपलब्ध झाले आहे. या विधी सेवा चिकित्सालयामुळे माजी सैनिकांना कौटुंबिक वाद, जमीनजुमल्याचे प्रश्न, पेन्शन संबंधित अडचणी आणि इतर कायदेशीर विषयांवर मार्गदर्शन तसेच न्यायालयीन कार्यवाहीसाठी मदत मिळणार आहे.

या कार्यक्रमास सहाय्यक जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी संजय गायकवाड, जवान फाउंडेशनचे अध्यक्ष ईश्वर मोरे, तसेच ॲड. रुपाली कुलकर्णी, ॲड. संदीप पाटील आणि भारती कुमावत हे उपस्थित होते. संजय गायकवाड आणि ईश्वर मोरे यांनी यावेळी उपस्थित सैनिकांना आणि त्यांच्या कुटुंबियांना सैनिक कल्याण कार्यालयातर्फे पुरविण्यात येणाऱ्या विविध सुविधांबद्दल माहिती दिली आणि मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाला जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाचे कर्मचारी आणि जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे कर्मचारी प्रमोद बी. ठाकरे, संतोष एस. तायडे, रवींद्र महाजन आणि सचिन पवार यांनी कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मोलाचे सहकार्य केले. या विधी सेवा चिकित्सालयामुळे जिल्ह्यातील सैनिक आणि त्यांच्या कुटुंबियांना कायदेशीर मदतीसाठी आता भटकंती करावी लागणार नाही, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.



