जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या आजीवन अध्ययन व विस्तार विभागाद्वारे ‘कवयित्री बहिणाबाई चौधरी’ व्याख्यानमालेत ‘कुतूहल अंतराळ विज्ञानाचे’ या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले.
अवकाश क्षेत्रात संशोधन करण्याची मोठी संधी असून विद्यार्थ्यांनी कोणतेही दडपण न घेता अवकाशशास्त्राचा अभ्यास करण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन नॅशनल स्पेस सोसायटीचे संचालक अविनाश शिरोडे यांनी केले.
कार्यक्रमाला प्रभारी संचालक प्रा. मनिष जोशी अध्यक्षस्थानी होते. अविनाश शिरोडे म्हणाले की, ग्रामीण भागातून आल्याचा न्युनगंड न बाळगता विद्यार्थ्यांनी आत्मविश्वास आणि कष्ट करण्याची तयारी ठेऊन अभ्यास करावा. ग्रामीण भागात ज्ञान व प्रतिभा मोठी आहे. आपणही ग्रामीण भागातून पुढे आल्याचे त्यांनी सांगीतले. भारत हा महासत्ता होण्याच्या मार्गावर असून त्यासाठी अवकाश क्षेत्रात काम करण्याची विद्यार्थ्यांना मोठी संधी आहे असेही ते म्हणाले. अध्यक्षीय भाषणात प्रा. मनिष जोशी यांनी विभागाची व व्याख्यानमाले विषयी माहिती दिली. प्रास्ताविक सुभाष पवार यांनी केले. सारांश सोनार याने आभार मानले. पाहुण्यांचा परिचय रश्मि नेरपगार हिने करून दिला.