
रावेर,शालिक महाजन | रावेर तालुक्याच्या राजकारणात शब्दाला जागणारे,सात्विक स्वभाव आणि विकासाभिमुख दृष्टी असलेले नेतृत्व म्हणजे अरुणदादा पाटील. दोन टर्म आमदार म्हणून त्यांनी केलेली कामगिरी आजही तालुक्यातील जनतेच्या स्मरणात ताजी आहे. त्यांच्या नावाशिवाय रावेरच्या विकासाची चर्चा पूर्ण होत नाही, असे चित्र आजही दिसून येते.

आमदारकीच्या काळात दादांनी पायाभूत सुविधांवर विशेष भर दिला. मात्रन धरणासारखी महत्त्वाची योजना असो किंवा मुक्ताईनगर-रावेरला जोडणारा तापी नदीवरील पूल, या कामांमुळे तालुक्याच्या विकासाला गती मिळाली. ग्रामीण भागातील रस्ते, पाणीपुरवठा आणि मूलभूत सुविधा यासाठी त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला. अनेक गावांमध्ये झालेली विकासकामे आजही त्यांच्या कार्यकाळाची साक्ष देतात.
शिक्षण क्षेत्रातही त्यांनी मोलाचे योगदान दिले. विशेषतः आदिवासी भागात शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी केलेले प्रयत्न उल्लेखनीय आहेत. गुणवत्तापूर्ण शिक्षण ग्रामीण भागात पोहोचावे, यासाठी त्यांनी विविध उपक्रम राबविले. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना शिक्षणाची नवी दिशा मिळाली.
कृषी क्षेत्र हा रावेर तालुक्याचा कणा आहे. शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेऊन त्यावर उपाययोजना करण्यासाठी दादांनी विधानसभेत ठाम आवाज उठविला. कृषी उत्पन्न बाजार समिती तसेच जिल्हा बँक जळगाव येथे संचालक म्हणून काम करताना त्यांनी शेतकरी हिताचे निर्णय घेतले. संकटकाळात शेतकऱ्यांना आर्थिक आधार मिळावा, यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले. त्यामुळे आजही अनेक शेतकरी त्यांच्याबद्दल कृतज्ञतेची भावना व्यक्त करतात.
राजकारणात निष्ठा आणि सातत्य जपणारे नेतृत्व म्हणून दादांची ओळख आहे. भाजपाचे एकनिष्ठ चेहरा म्हणून त्यांनी पक्षाशी बांधिलकी राखली. बाजार समिती निवडणुकीत दादाच्या नेतृत्वाखालील मागील तीन पंचवार्षिक पॅनलला सर्वपक्षीय पॅनल बहुमताने विजय मिळत आहे. त्यांच्या नेतृत्वगुणांचा प्रत्यय मानला जातो.
दादा केवळ राजकारणी नाहीत, तर कार्यकर्त्यांचे देखिल ते मार्गदर्शकही आहेत.दादा वारकरी संप्रदाय जुने सहकार्य असुन भक्तीशी सुध्दा दादाचा टच राहीला आहे.
अनेक कार्यकर्त्यांना त्यांनी संधी देत त्यांना मोठे केले. त्यांना विविध पदांवर संधी मिळवून देत संघटन मजबूत केली. जमिनीवर राहून लोकांशी थेट संवाद साधणे ही त्यांची खासियत आहे. त्यामुळे “आपले दादा” अशी ओळख त्यांनी निर्माण केली आहे.सात्विक स्वभाव, विकासाची दृष्टी, कार्यकर्त्यांवरील विश्वास आणि जनतेशी असलेला जिव्हाळा यामुळे अरुणदादा पाटील हे रावेर तालुक्याच्या राजकारणातील केंद्रबिंदू ठरले आहेत.
त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि पुढील सामाजिक-राजकीय वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा!



