जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरात सातत्याने होणाऱ्या मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्यांतील संशयित आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने उस्मानिया पार्क येथून गॅरेज मॅकेनिकला शनिवारी ६ डिसेंबर रोजी रात्री ८ वाजता अटक केली आहे. त्या कारवाईत चार मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्यांची उकल करण्यात आली आहे.

उस्मानिया पार्क, शिवाजी नगर येथील रहिवासी असलेला माजिदअली लियाकतअली हा गॅरेज मेकॅनिकचे काम करत असून, तो गेल्या काही दिवसांपासून मोटारसायकल चोरण्याचे गुन्हे करत आहे. अशी माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहूल गायकवाड यांना मिळाली. त्यानुसार पथकाने शनिवारी ६ डिसेंबर रोजी रात्री ८ वाजता संशयित आरोपी माजितद अली लियाकत अली याला उस्मानिया पार्क परिसरातून अटक केली आहे. त्याने जिल्हापेठ पोलीस स्टेशनच्या हद्दीतून वेगवेगळ्या ठिकाणांहून चार मोटारसायकली चोरी केल्याची कबुली दिली.

माजिदअली याने ४ एप्रिल रोजी धुळे सायकल मार्टजवळून (सरताज कलीम मणियार यांची MH १९ DK ११७६), तसेच २९ नोव्हेंबर आणि २३ नोव्हेंबर रोजी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (GMC) परिसरातून दोन वेगवेगळ्या मोटारसायकली चोरी केल्याचे कबूल केले. आरोपीला मोटारसायकल दुरुस्तीचे ज्ञान असल्यामुळे तो सहजपणे चोरी करत होता.
पोलिसांनी माजिदअली याच्याकडून चोरी केलेल्या चारपैकी तीन मोटारसायकली हस्तगत केल्या आहेत. पुढील तपास आणि कायदेशीर प्रक्रियेसाठी आरोपीला जिल्हापेठ पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले असून, पोना प्रदीप पाटील पुढील तपास करीत आहेत.
सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते आणि उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली LCB चे व पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड आणि त्यांच्या टीमने यशस्वीपणे पार पाडली.



