नॉयलॉन मांजा विक्रेत्यांवर एलसीबीची कारवाई; १३ हजारांचा मुद्देमाल जप्त

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । प्रतिबंधित असलेला नायलॉनचा मांजा विक्री करणाऱ्या जोशी पेठ येथील दोन जणांवर जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शनिवारी ७ डिसेंबर रोजी दुपारी १ वाजता कारवाई करत अटक केली आहे. दोघांकडून १३ हजार ६०० रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी रात्री ८ वाजता दोघांवर शनीपेठ पोलीस ठाण्यात दोन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

अधिक माहिती अशी की, जळगाव जिल्ह्यात पतंग उडविण्यासाठी सुरूवात झाली असून विविध प्रकारचे मांजा विक्रीसाठी जळगावात आणण्यात आले आहे. यात प्रतिबंधित असलेला नॉयलॉनचा मांजा जोशीपेठ परिसरात विक्रीसाठी आणण्यात आले असल्याची माहिती जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली. त्यानुसार शनिवारी ७ डिसेंबर रोजी दुपारी १ वाजता पथकाने कारवाई करत दोन ठिकाणी छापा टाकला. यात विक्री उर्फ माया गणेश शिंदे वय-२० रा.चौघुले प्लॉट, जळगाव आणि कुणाल किशोर साखला वय ३२ रा.जोशीपेठ जळगाव यांच्यावर कारवाई करत त्यांच्याकडून १३ हजार ६०० रूपये किंमतीचा नॉयलॉन मांजा जप्त करण्यात आले आहे. या कारवाईमुळे मांजा विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या पथकातील उप निरीक्षक राहुल तायडे, गणेश वाघमारे, सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, रवी नरवाडे, पोहेकॉ हरीलाल पाटील, प्रदिप सपकाळे, प्रदिप चवरे, गोपाल गव्हाळे, सचिन पोळ यांनी केली आहे.

Protected Content