कायदा व सुव्यवस्था ढासळली ; जळगाव जिल्ह्याला कोणी वाली नसल्यासारखी स्थिती

92a6c91c 338a 4ac9 9877 51c3344c2521

जळगाव (प्रतिनिधी) गेल्या काही महिन्यांपासून जिल्ह्य़ात पोलीस यंत्रणेचे अस्तित्व नसल्याचे चित्र तयार झाले आहे. सर्व गोष्टी नियंत्रणात आणि पोलिसांचा धाक राहील, अशी परिस्थिती निर्माण करण्यात पोलीस अधीक्षक म्हणून पंजाबराव उगले यांना अपयश आलेय. ही बाब आजच्या घडीला कुणीही नाकारू शकत नाही. कायदा व सुव्यवस्था ढासळली असताना जळगाव जिल्ह्याला कोणी वाली नसल्यासारखी स्थिती आहे. म्हणून जळगावकर रस्त्यावर उतरणे स्वाभाविकच असून जिल्ह्यातील दोघं मंत्री महोदय काय बघताय? असाच प्रश्न लोकांना सतावतोय.

 

जिल्ह्यात मागील काही दिवसापासून खून, हाणामाऱ्या आणि चोऱ्या जणू शासकीय मान्यता असल्यागत उघडपणे होताय. म्हणून मग प्रश्न असा पडतो की, जिल्ह्यात पोलीस दल नावाचा प्रकार शिल्लक आहे की, नाही? . काल नागरिक स्वयंमफुर्तीने रस्त्यावर उतरून पोलीस दलाचा निषेध करतात. एवढ्चे नव्हे तर एसपी साहेबांची बदली करायची मागणी केली. बरं रात्रीतून आंदोलकांवर गुन्हा दाखल केला. मग प्रश्न असा पडतो…की आंदोलकांवर रस्त्यावर उतरण्याची वेळ कुणामुळे आली?. मध्यरात्रीपर्यंत हॉटेल कुणाच्या आशीर्वादाने सुरु होती. अगदी एसपी साहेबांनी खिडकी उघडून बघितले असते, तरी भजी गल्लीसह हॉटेल रिगल सुरु आहे की बंद? हे दिसले असते.

 

मुख्यमंत्र्यांच्या नागपूरमध्येच एका रात्रीतून तीन खून होत असतील. तर राज्यातील पोलीस दलात गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांचा काय वचक राहणार आहे? ही बाब सामान्य नागरिकालाही कळतेय. म्हणून तर मुख्यमंत्री जळगावात येण्याच्या एक दिवस आधी दाम्पत्याला दिवसा ढवळ्या लुटले जाते. मुख्यमंत्र्यांच्या यात्रेत चोऱ्या होतात. तर मुख्यमंत्री जळगावातून बाहेर पडत नाही, तोच दुसऱ्या दिवशी एका राजकीय पदाधिकाऱ्याचा खून झाल्यानंतरही जळगावकरांनी संयम ठेवावा अशी अपेक्षा ठेवली जातेय.

 

जिल्ह्य़ात गेल्या काही महिन्यापासून गुन्हेगारीचे प्रमाण मोठय़ा प्रमाणात वाढले आहे. चोरी,दरोडे आणि खून प्रकरणांनी तर कळस गाठला आहे. अवैध धंदे हा पोलिसांच्या कृपाछत्राने चालणारा उद्योग वाटावा, अशीच एकूण स्थिती आहे. कारण दोन नंबरचे धंदे नावाला बंद आहेत. तर दुसरीकडे वाळू चोरी खुलेआम सुरु आहे. गेल्या वर्षभरात खून, दरोडे या प्रकारांनीही जनतेत भीती व दहशतीचे वातावरण पसरले आहे. घरफोडय़ा, चोऱ्या तर आता जळगावकरांच्या अंगवळणी पडल्यागत झाल्या आहेत.

 

आजच्या घडीला जळगाव जिल्ह्य़ात पोलीस यंत्रणेविषयी सर्वसामान्यांना भक्कम आधार व विश्वास वाटेल असे चित्र नाही, हि वस्तूस्थिती आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांना आश्वस्त करण्याऐवजी आंदोलकांवर गुन्हे दाखल होताय. ही बाब निश्चित विचार करायला लावणारी आहे. कायदा मोडला तर कायदा आपले काम करेल. पण कायदा लोकांना हातात कुणा मुळे घ्यावा लागला, याचा विचार होणे देखील गरजेचे आहे. दुसरीकडे त्या हॉटेलवर आणि रात्री गस्तीवर नसलेल्या पोलिसांवर कोणती कारवाई केली? याचे उत्तरही पोलीस अधीक्षक उगले साहेबांना द्यावेच लागेल. जिल्ह्य़ातील कायदा-सुव्यवस्थेला सुशिस्त लागून, परिस्थिती नियंत्रणात राहील. कायद्याविषयी धाक वाटेल, असे चित्र निर्माण केल्यास जळगावची जनता पोलीस दलाचा आदरच करेल.

Protected Content