शेंदूर्णी, प्रतिनिधी । कोरोना विषाणूचा संसर्ग वाढू नये यापार्श्वभूमीवर राज्य शासनातर्फे ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ ही मोहीम ५ सप्टेंबरपासून सुरू करण्यात आली आहे. यानुसार आज शेंदूर्णी नगरपंचायतीमध्ये नगराध्यक्ष विजया खलसे यांच्या प्रमुख उपस्थितीत या अभियानास प्रारंभ करण्यात आला. याप्रसंगी उपनगराध्यक्ष चंदाबाई अग्रवाल, मुख्याधिकारी साजिद पिंजारी व सर्व नगरसेवक, नगरसेविका उपस्थित होते.
कोरोनाचा प्रचार प्रसार थांबवून मृत्यू दर कमी करणे या करिता शासनाने ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी अभियान’ ही मोहीम सुरु केली आहे. त्यानुसार शेंदूर्णी नगरपंचायतीने शहरात सर्वेक्षण व नागरिकांच्या आरोग्य तपासणीसाठी नियोजन केले आहे. यात १२ आरोग्य तपासणी पथकांची निर्मिती करण्यात आली असून त्या पथकांमार्फत प्रथम ५० वर्षांवरील व्यक्तींचे सर्वेक्षण करण्यात येत आहे.
त्यात नाव ,वय,लिंग, कोमोर्बीड (आजाराची पार्श्वभूमीवर)तसेच शरीराचे तापमान व ऑक्सिजन पातळी याची माहिती संकलित केली जात आहे. सन २०११ चे जणगननेनुसार शेंदूर्णी शहरातील लोकसंख्या २२५५३ सर्वच नागरिकांची तपासणी करण्यात येणार आहे. या पूर्वीही शासनाने वेळेवेळी दिलेल्या दिशानिर्देशानुसार कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी नगरपंचायत मार्फत प्रभावी उपाययोजना राबविण्यात आल्या आहेत.