पहूर, ता. जामनेर प्रतिनिधी । जळगाव जिल्ह्यात वाढत्या कोरोना विषाणू संक्रमणाला प्रतिबंध करण्यासाठी जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्या आदेशानुसार जामनेर शहरासह संपूर्ण तालुक्यात ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी ‘ या अभियानाच्या दुसऱ्या टप्प्याअंतर्गत कोवीड संशयित रुग्ण शोध मोहीमेस आजपासून सुरुवात करण्यात आली आहे.
या मोहीमेस पहूर येथे सुरुवात करण्यात आली असून सदर मोहीमेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी गट विकास अधिकारी ज्योती कवडदेवी , तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर राजेश सोनवणे यांनी आज पहूर येथे भेट देऊन मार्गदर्शन केले.
जनतेने कोरोना सदृश लक्षणे जाणवल्यास त्वरित चाचणी करून घ्यावी , लसीकरण करून स्वतःचे संरक्षण करावे तसेच मास्क , सॅनीटायझरचा उपयोग करावा , सार्वजनिक ठिकाणी सोशल डिस्टंसिंगचे पालन करावे असे आवाहन केले .तालुका वैद्यकीय अधिकारी राजेश सोनवणे यांनी यावेळी सांगितले की ,नागरिकांनी सर्वेक्षण पथकाला सहकार्य करावे , आपली स्वतःची व कुटुंबाची काळजी घ्यावी .
पहूर येथे चौदा पथके तैनात करण्यात आली आहेत .मोहिमेच्या पथकांमध्ये शिक्षक, अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा स्वयंसेविका, ग्रामपंचायत कर्मचारी,नगरपालिका कर्मचारी यांचा सहभाग आहे. ग्रामीण भागात ग्रामसेवक, सरपंच, पोलिस पाटील हे तर शहरी भागात,नगरपालिका, नगरसेवक, नगराध्यक्ष व स्वयंसेवी संस्था सदर मोहिमेसाठी टीम मधील सदस्यांना मदत करीत आहेत. जलद सर्वेक्षणाच्या आधारावर टीम कडुन घरोघरी जाऊन संशयित कोवीड रुग्ण शोधून तात्काळ त्यांची चाचणी करण्यात येत आहे.
जामनेर येथे २० पथके ,शेंदूर्णी येथे ८ पथके तर उर्वरित तालुक्यात २९७ पथकांची नेमणूक तहसीलदार अरुण शेवाळे यांच्या आदेशाने करण्यात आली आहे. तरी नागरिकांनी मोहिमेस सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासनाकडून ग्रामीण भागात गटविकास अधिकारी जे.व्ही. कवडदेवी यांच्याकडून करण्यात आले.
काही टीमकडे पल्स ऑक्सिमिटर, थर्मलगन नादुरुस्त असल्याचे लक्षात आले. गटविकास अधिकारी यांनी तात्काळ शिक्षकांना उपस्तीत केले व पहुर पेठ,पहुर कसबे ग्रामसेवकांना टीम निहाय तात्काळ आजच साहित्य उपलब्ध करून देण्याचे आदेश दिले. सदर प्रसंगी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेश सोनवणे यांनी उपस्तितांना मार्गदर्शन केले व स्वतः ची काळजी घेऊन सर्वेक्षण करण्याचा सुचना दिल्या. या वेळी ग्रामीण रुग्णालय पहुरचे वैद्यकीय अधिकारी डॉ. जितेंद्र वानखेडे, तालुका मलेरिया पर्यवेक्षक व्ही.एच.माळी, पत्रकार गणेश पांढरे यांच्या सह सर्व शिक्षक, आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका उपस्थित होत्या. गणेश राऊत यांनी स्वागत केले .शहर पत्रकार संघाचे अध्यक्ष शंकर भामेरे यांनी सूत्रसंचालन केले.